मुंबईत लोकलमधील गर्दीमुळे होणाऱया अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन काही उपायांची चाचपणी करून पाहण्याच्या तयारीत आहे. लोकलमध्ये प्रवाशांना ऐसपैस जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईच्या लोकलमध्ये मेट्रोसारखी आसनव्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या फेब्रुवारीपर्यंत याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकलमधील गर्दीमुळे पडून मृत्यू झाल्याचा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. त्यामुळे लोकलमधील आसनव्यवस्था बदलण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. मुंबई मेट्रोप्रमाणे लोकलमध्ये आसनव्यवस्था केली तर गर्दीचा ताणण कमी होऊ शकतो, असा रेल्वे प्रशासनाचा यामागचा मानस आहे, पण तो कितपत यशस्वी ठरू शकतो याबाबत अद्याप साशंकता आहे.