हिंदी सिनेमात डायलॉग आहे, “कानून और पुलिस के हात लंबे होते है” याची प्रचीती रेल्वे पोलिसांच्या धडक कारवाईत आली. रेकॉर्डवरील ९ सराईत पाकीटमार आणि मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात वांद्रे रेल्वे पोलिसांना यश आले. सर्वकाही पोलिसांच्या नजरेआड होत असते, मात्र पोलिसांनी जर निश्चय केला तर त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. हे या धडक कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. ९ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून मोबाइल-पाकीटमारीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महागडे मोबाइल आणि पाकिटे मारणारी टोळी रेल्वेत सक्रीय आहे. रोज शेकडो मोबाइल चोरल्याच्या आणि पाकीटमारीच्या घटना घडत असतात. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी वाढत्या घटनांना आणि सराईत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिमेचा एल्गार केला. वरिष्ठांच्या आदेशानुसार जे. एस. सागवेकर, दि. जी. गीते, आर के पवार, आर. दि. पवार या पथकाने मोहिमेच्या नऊ दिवसांत गुन्हेगारांवर खडा पहारा देत पाकीटमारी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या 9 जणांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी चार पाकीटमारी आणि चार मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून चार चोरीचे मोबाइल, चार पाकीट, रोकड, आधारकार्ड, रेल्वे पास आणि इतर प्रवाशांची महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

९ आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलीस पथकाने आरोपींना वांद्रे स्थानिक न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने आरोपींना न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देत त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत केली असल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली. रेल्वे पोलिसांच्या या धडक कारवाईने वाढत्या गुन्ह्यांना निश्चितच आळा बसणार आहे.

बिलाल अली हुसैन शेख, राकेश ललन चौधरी, विश्वास प्रेमकुमार झा, सिद्धप्पा , मोहम्मद जोएब मोहम्मद शरीफ शेख, डोहेल हसन शेख, साबीर मकबूल खाण उर्फ साबेरी, सलमान सलीम शेख, गोपालकुमार बाबुकांत झा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.