मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय सेवेवर दर दिवशी होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात रेल्वे विविध ठिकाणी झालेल्या पाच रेल्वे अपघातांत चार जणांचा मृत्यू होण्याची घटना घडली, तर पाचव्या अपघातातील महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी बहुतांश अपघात हे प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळेच झाले आहेत.
उपनगरीय रेल्वे मार्गावर शुक्रवारी झालेल्या पाच अपघातांपैकी तीन अपघात ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. यापैकी पहिली घटना हा अपघात नव्हता. कळवा येथे राहणारे श्रीनिवास जोग (५६) ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सकाळी सव्वानऊच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत मुलुंड येथे राहणारे सतीश विचू (४५) हे कळवा व ठाणे या स्थानकांदरम्यान सकाळी ९.४० वाजता लोकलची धडक लागून मृत्युमुखी पडले, तर दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंब्रा व कळवा या स्थानकांदरम्यान लोकलची धडक लागून कृष्णा सिंह (१७) तरुण मृत्युमुखी पडला.
पश्चिम उपनगरांत बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. कांदिवली येथे राहणाऱ्या करण मेहता (२०) या तरुणाला मालाड ते गोरेगाव या दरम्यान रूळ ओलांडताना लोकलची धडक लागली. या अपघातात तो जागीच ठार झाला, तर संध्याकाळी कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची धडक लागून एक महिला जखमी झाली. या महिलेवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वे मार्गावर दर दिवशी होणारे अपघात ही काळजीची बाब आहे, मात्र हे अपघात थांबवणे पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे आहे. प्रवाशांनी आपल्या जिवाची काळजी घ्यायला हवी. रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी पादचारी पुलांचा वापर करण्याची सवय प्रवाशांनी अंगीकारायला हवी.
डॉ. रवींद्र सिंघल, रेल्वे पोलीस आयुक्त