३५० लोहमार्ग पोलीस राज्यात निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी रवाना

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असून त्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांतील सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उपनगरीय स्थानकांतील सुरक्षेसाठी तैनात असलेले ३५० लोहमार्ग पोलीस सांगली, सातारा आणि अन्य ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. सध्या लोहमार्ग पोलिसांकडे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तोकडे मनुष्यबळ असून मदतीसाठी गृहरक्षकही नाहीत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळातच प्रवाशांची सुरक्षा करावी लागत आहे.

रेल्वे हद्दीत होणाऱ्या गुन्ह्य़ांना आळा घालणे, तपास करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांकडून केले जाते. याशिवाय महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांकडे मंजूर पदांची संख्या ३ हजार ७८० असून प्रत्यक्षात ३ हजार १७२ पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे ६०८ पोलिसांची गरज असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. टाळेबंदीआधी गृहरक्षक लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला होते; परंतु तेही काढून घेण्यात आले.  किमान ६०० गृहरक्षक देण्याची मागणी लोहमार्ग पोलिसांनी गृहरक्षक खात्याकडे के ली आहे. त्याबाबतही निर्णय झालेला नाही. ही परिस्थिती असतानाच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील तैनात लोहमार्ग पोलिसांनाच पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ३५० पोलीस मंगळवारी अन्य ठिकाणी रवाना करण्यात आले. सध्या लोकल सेवा सर्वासाठी खुली झालेली नाही, तरीही पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वेतून १६ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर असणार आहे.

पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार लोहमार्ग पोलिसांना निवडणूक बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहे. उपलब्ध मनुष्यबळातही प्रवाशांची सुरक्षा करण्यास लोहमार्ग पोलीस सज्ज आहेत. बंदोबस्तासाठी गेलेले ३५० लोहमार्ग पोलीस १७ जानेवारीपर्यंत पुन्हा येतील.

रवींद्र सेनगावकर, लोहमार्ग पोलीस आयुक्त

११२ आरोपींना अटक

२०१९ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांत ३० हजारपेक्षा जास्त गुन्हे घडले होते. २०२० मध्ये सात हजारपेक्षा जास्त गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या १५० पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षांत लोकल प्रवासात दरवाजाजवळ उभे असलेल्या प्रवाशांना फटका मारून चोरी करणारे ९८ गुन्हे दाखल झाले असून ४५ गुन्ह्य़ांचा तपास लागला आहे, तर ११२ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.