– संदीप आचार्य

राज्यात तसेच मुंबईवरील करोनाचे संकट वाढत असल्यामुळे आरोग्य सेवा अधिक व्यापक व बळकट करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर दिला आहे. त्याचवेळी फक्त रुग्णालय कर्मचारी व पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल ट्रेन सुरु करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

करोनामुळे मुंबईत २५ वर्षांच्या युवकासह १२ जणांचा शनिवारी मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. तर करोनाची लागण झालेल्या १८९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे.

मुंबईसह राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना ‘ तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो’ अशी सुस्पष्ट भूमिका उद्धव यांनी मांडली. पंतप्रधांबरोबरील बैठकीनंतर सायंकाळी मुख्य सचिव, पालिका आयुक्त, वैद्यकीय शिक्षण सचिव,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच महत्वाच्या अधिकार्यांबरोबरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील व राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत आता करोना रुग्णांवरील उपचारात सुसूत्रता आणण्यात आली असून तीन टप्प्यात रुग्णांना रुग्णालयांमध्ये तसेच विलगीकरणाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रुग्णांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन विलगीकरण, चाचणी व उपचाराची काय व्यवस्था केली जाणार आहे त्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात टाळेबंदी अधिक कडक करण्याची गरज तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहन व्यवस्थेची कमतरता. अजूनही अनेक भागात लोक टाळेबंदी गंभीरपणे घेत नसून गाड्यांमधून लोक बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा पोलिसांना कठोर होण्याचे आदेश उद्धव यांनी दिले.

तसेच डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोलीस तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी अशी दिवसातून किमान दोनवेळा लोकल ट्रेन सुरू करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. तसेच केंद्र सरकारकडे याबाबत विचारणा करून योग्य ती कार्यवाही करण्यास त्यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सूचना दिल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

आगामी काळात रुग्णालये व पोलिसांवर मोठा ताण येणार असून मुंबई बाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांना मुंबईत आपल्या नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी अनेकदा कामाच्या ठिकाणीच बरेच दिवस राहावे लागते. यात त्यांची कौटुंबिक परवडही होत असून या सर्व गोष्टींचा विचार करून किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दिवसातून दोन वेळा लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. याबाबत केंद्राशी चर्चा करून निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.