दर दिवशी ८० लाखांहून अधिक प्रवाशांना मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दोन वेळा नेण्याचं काम मोटरमन पार पाडतात. त्यांचा पगार लाखाच्या घरात असलेला प्रवाशांना दिसतो, मात्र त्या लाखांसाठी दर दिवशी डोळ्यात तेल ओतून काम करण्यापासून ते जवळपास दर दोन ते तीन दिवसांआड एक मृत्यू पाहण्यापर्यंत अनेक हालअपेष्टा मोटरमनना सहन कराव्या लागतात..

धडधडणारी लोकल गाडी अचानक एखाद्या स्टेशनाआधी थांबते आणि काही काळासाठी थांबूनच राहते. लोक अस्वस्थ होऊन दरवाजांतून डोकावून पाहायला सुरुवात करतात. काही हौशी लोक गाडीतून उतरून रुळांवरूनही चालायला लागतात आणि उरलेले लोक मोटरमनला शिव्या मोजत घाम पुसायला सुरुवात करतात.. वास्तविक सिग्नलला गाडी का थांबवली, याचे उत्तर मोटरमनकडेही नसते. पण प्रवाशांच्या जवळचा आणि प्रवाशांच्या हाती सहज लागणारा कर्मचारी म्हणून मोटरमनला शिव्या खाव्या लागतात.
वास्तविक लाखो लोकांना दर दिवशी एका टोकापासून दुसऱ्या टोकाला नेणारे आणि पुन्हा घरी आणणारे मोटरमन हे आधुनिक श्रीकृष्ण म्हणायला हवेत. लोकांना या मोटरमनना मिळणारा लाखभर रुपयांचा पगार दिसतो, पण त्यामागे खाव्या लागणाऱ्या खस्ता दिसत नाहीत. या खस्ता म्हणजे त्यांच्या कामाची गरज आहे, असा युक्तिवादही काही लोक करतील. पण थोडा विचार केला, तर हा युक्तिवाद चुकीचा म्हणावा लागेल.
सध्या मध्य रेल्वेवरील १६६० फेऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात ७०७ मोटरमन आहेत. वास्तविक ही संख्या ८७० असणे अपेक्षित आहे. पण मध्य रेल्वेवर मोटरमनची १६३ पदे रिक्त आहेत. पश्चिम रेल्वेवर परिस्थिती एवढी वाईट नसली, तरी तेथेही ७३९ मोटरमनची गरज असताना प्रत्यक्षात ६६५च्या आसपास मोटरमन आहेत. ही कमी संख्या मोटरमनच्या अनेक समस्यांपैकी एक आहे. मोटरमनच्या कमी संख्येमुळे अनेकांना ठरावीक वेळेपेक्षा जास्त काम करावे लागते. मोटरमनला दिवसातून सहा तास काम करणे नियमाने बंधनकारक आहे. मोटरमन कामावर आला आणि त्याने गाडी चालू केली की, हे सहा तास सुरू होतात. अनेकदा बिघाडांमुळे गाडय़ा रखडल्या, तर मोटरमनला गाडी सोडून जाता येत नाही. त्यामुळे अधिकृतपणे जादा तास काम न करताही मोटरमनच्या कामाचे तास सात ते आठ एवढे भरतात.
ही बाब अधिक ठळक झाली होती ती २६ जुलै २००५ च्या महापुराच्या वेळी! त्या वेळी ठिकठिकाणी अडकून पडलेल्या गाडय़ांमध्ये मोटरमनही अडकले होते. प्रवासी गाडय़ांमधून उतरून आपापल्या गंतव्यस्थानी पायी जात असताना मोटरमन मात्र गाडय़ा सोडून जाऊ शकत नव्हते. गेल्या महिन्यात विक्रोळी येथे झालेल्या बिघाडादरम्यानही अनेक मोटरमन पाच-पाच तास गाडीत अडकून पडले होते. या वेळी त्यांना लघुशंका किंवा दीर्घशंका लागल्यास त्याची सोय काय, हा विचार अद्याप केलेला नाही. अनेकदा आपली गाडी का अडकून पडली आहे, याची माहिती मोटरमननाही नसते.
कामावर आल्या आल्या मोटरमनची ब्रेथ अ‍ॅनॅलायझर टेस्ट होते. म्हणजेच मोटरमनने मद्यपान केले आहे की नाही, हे तपासले जाते. त्यानंतर त्याला त्याच्या गाडीवर पाठवले जाते. तेथे जाताना त्यांच्या हाती त्या दिवसांत कुठे वेगमर्यादा आहेत का, कायमस्वरूपी वेगमर्यादा, तात्पुरत्या वेगमर्यादा यांचा तक्ता दिला जातो. या तक्त्यावर किलोमीटर क्रमांक, त्या ठिकाणी गाडीचा वेग आदी गोष्टी लिहिलेल्या असतात. गाडी चालवताना हा तक्ता समोर ठेवून त्यांना त्या ठरावीक ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करावा लागतो. तसेच दर ४०० मीटर अंतरावर असलेल्या सिग्नलवरही नजर ठेवावी लागते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये या कामासाठी लोको पायलटच्या बाजूला साहाय्यक लोको पायलट असतो. मात्र मोटरमनला हा प्रकार एकटय़ालाच करावा लागतो. त्यामुळे त्याच्या एकाग्रतेची कसोटी असते.
मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर दर दिवशी सरासरी १० मृत्यू होतात. यापैकी काही अपघात असतात, तर बहुतांश आत्महत्या! काही जण जीव देण्याच्या तयारीनेच रेल्वेपुढे येऊन उभे राहिलेले असतात. गाडीचा वेग एवढा प्रचंड असतो की, गाडी थांबवणेही शक्य नसते. काही जण कानात हेडफोन घालून रेल्वेरूळ ओलांडत असतात, काही सकाळच्या वेळी शौचाला रेल्वे रूळांवर येऊन बसतात. असे लोक गाडीखाली येताना मोटरमनना पाहावे लागते तेव्हा ही कसोटी आणखीच खडतर होते. आठवडय़ातून किमान एक तरी अपघात बघणाऱ्या मोटरमनला त्या दिवशी जेवण जात नाही आणि कधी कधी दोन-तीन रात्री झोपही लागत नाही, असे मध्य रेल्वेवर गेली १५ वर्षे काम करणाऱ्या एका मोटरमनने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.
मोटरमन पदावर काम करणारे ३५ टक्के लोक निवृत्तीआधीच हृदयरोगाने दगावतात, असा अभ्यास समोर आला आहे. त्यामुळे आता रेल्वे कामगार संघटना आणि मोटरमनच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या संघटना याबाबत आवाज उठवत आहेत. अनेक मोटरमनच्या म्हणण्यानुसार त्यांना जादा काम करण्यात अजिबातच रस नसतो. जादा कामाचे पैसे चांगले मिळत असले, तरी त्यात शारीरिक कष्ट खूप असतात. सामान्य प्रवाशांप्रमाणे मोटरमनही कामाच्या ठिकाणी येण्यासाठी दीड तासांचा प्रवास करतात. अनेकदा लॉबीमध्ये पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीचीही वानवा असते. शेवटच्या लोकलने कर्जतपर्यंत जाणाऱ्या मोटरमनसाठी आराम करण्याची व्यवस्था फारशी चांगली नाही.
एवढय़ा सगळ्या समस्यांमधूनही लाखो लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेऊन रेल्वेचा हा सारथी शांतपणे एक ब्रिफकेस हातात घेऊन आपल्या केबिनपर्यंत चालत असतो. अनेकदा प्रवासी येऊन एखादी हाणून जातात, कधी वेग पाच किलोमीटर जास्त होता म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तंबी मिळते, पण हा मुंबईकरांचा ‘नेता’ त्या सगळ्या गोष्टी मागे सोडून गाडीचा हॉर्न जोरदार वाजवतो, दोन वेळा घंटा वाजल्याचा इशारा गार्डकडून मिळाल्यावर गाडी सुरू करतो आणि एक प्रवास दर दिवशी पुन्हा नव्याने सुरू करतो..
रोहन टिल्लू