बेलापूर स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक खोळंबली आहे. अप आणि डाऊन दिशेकडील लोकल गाड्यांना या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. हार्बर रेल्वेवर सध्या मुंबई सीएसटीएम ते नेरुळ या मार्गावरच वाहतूक सुरु असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

हार्बर रेल्वेवर नवी मुंबईला उरणशी जोडणाऱ्या सीवूड्स उरण रेल्वे मार्गाच्या कामांसाठी चार दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. मंगळवारी सकाळी यातून सुटका होईल, अशी प्रवाशांना आशा होती. मात्र, सकाळी ऐन गर्दीच्या वेळी बेलापूर स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली आणि ऑफीसला निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. या मार्गावर सध्या वाशी ते पनवेल या मार्गावरील वाहतूक खोळंबली.  हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरुन (ठाणेमार्गे वाशी- पनवेल) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.