मुसळधार पावसामुळे मुंबईची विस्कटलेली घडी शनिवारी सकाळपासून पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे. कालच्या पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवसह अनेक सेवा कोलमडून पडल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले होते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा वेग मंदावल्यामुळे आता शहरातील काही भाग वगळता पाण्याचा बऱ्याच प्रमाणात निचरा झाला आहे. मानखुर्द सर्कल, किंग्ज सर्कल, मिलन सब वे या भागांतील पाण्याचा निचरा करण्यास पालिकेला अद्यापही यश आलेले नाही.
दरम्यान, पावसाचा सर्वात जास्त फटका बसलेली मुंबईतील रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. काल रेल्वेच्या रूळांवर साचलेल्या पाण्याचा आता संपूर्णपणे निचरा झालेला आहे. त्यामुळे काल संपूर्णपणे ठप्प असलेली रेल्वे वाहतूक आता सुरू झालेली आहे. मात्र, पावसानंतर उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडांमुळे पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काहीशा विलंबानेच सुरू आहे. मध्य रेल्वेमार्गावर आसनागावजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर माहीम स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुरूवातीच्या काळात रेल्वे वाहतूक अतिश्य धीम्या गतीने सुरू होती. याशिवाय, मुंबईच्या सर्व भागांतील रस्ते वाहतूकदेखील विनासायासपणे सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
दरम्यान, शनिवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर रेल्वे ट्रॅकशेजारी पाणी साचल्याने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे २० मिनिटे, तर हार्बर रेल्वेची वाहतूक ३० मिनिटे उशिराने सुरु आहे.
शुक्रवार रात्री ८ ते शनिवार सकाळी ८च्या दरम्यान शहरात १७०.५७ मिमी, पूर्व उपनगरात १३४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १२१ मिमी पावसाची नोंद झाली.