तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष व नियोजनाचा अभाव; मध्य रेल्वेचे नियोजन ढासळले

मुंबई : तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव, यामुळे गेला महिनाभर रेल्वे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

लोकलचे वेळापत्रक सुरळीत करा, असे आदेश चार दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेला दिले. पण ते दुरूस्त करण्याऐवजी बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मेगाब्लॉकचे वेळापत्रक चालवून मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या नियोजनशून्य कारभाराची पावतीच जणू गोयल यांना दिली. तोही पावसाचा एक टिपूस मुंबई-ठाण्यात नसताना. तांत्रिक बिघाड व अन्य कारणांमुळे जून महिन्यात ६०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या उशिराने धावल्या. त्यानंतर आता जुलै महिन्यात पाऊस सुरू होत नाही तोच लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

एल्फिन्स्टन स्थानकात झालेली चेंगराचेंगरी, अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलावरील कोसळलेली पादचारी मार्गिका या घटनांनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पादचारी पुलांची कामे मार्गी लावण्याबरोबरच लोकल वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आदेश वारंवार दिले. मात्र त्यानंतरही वेळापत्रकात सुधारणा झालेली नाही. जून महिन्याआधी आठवडय़ाला सरासरी एक मोठा बिघाड व दोन ते तीन छोटे बिघाड होत होते. ते प्रमाण दिवसाला एक मोठा बिघाड व चार ते पाच छोटे बिघाड असे झाले आहे. त्यामुळे वेळापत्रक वारंवार कोलमडून पडते आहे.

यात भर पडली ती एप्रिल ते जूनपर्यंत सोडण्यात आलेल्या ५००हून अधिक उन्हाळी विशेष गाडय़ांची. या गाडय़ा मुंबईतून सोडताना व मुंबईत परतताना गर्दीच्या वेळी त्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकल वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले. त्यामुळे दिवसाला ४० ते ५० लोकल फेऱ्या उशिराने धावू लागल्या व प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होत गेली. संसदेत याविषयी प्रश्न उपस्थित होताच २९ जून रोजी मुंबईत रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मध्य व पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत गर्दीच्या वेळी उन्हाळी विशेष गाडय़ांना प्राधान्य देऊ नका, असे स्पष्ट आदेश गोयल यांनी दिले. ही बैठक होऊन काही दिवस उलटत नाही तोच १ जुलैपासून मध्य रेल्वेवर लोकल गाडय़ांचा गोंधळ उडत आहे. पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा करत या वेळी लोकल सुरळीत राहतील, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या मध्य रेल्वेचा दावा फोल ठरला. ठाणे, कांजूरमार्ग, विद्याविहार ते माटुंगा दरम्यान रुळावर पाणी, तसेच तांत्रिक बिघाड होत असतानाच त्यात ढिसाळ नियोजनही दिसून आले. रविवार ते मंगळवार दुपापर्यंत पडणाऱ्या मुसळधार पावसात लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. मंगळवारी सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा ठप्प राहिल्यानंतर उसंत घेतलेल्या पावसानंतर बुधवारी लोकल सुरळीत होतील असे वाटत होते, परंतु मध्य रेल्वेने हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार इशाऱ्यानंतर बुधवारी सकाळपासून रविवार वेळापत्रक लागू केले व कमी लोकल फेऱ्या चालवून गोंधळ उडवला. परंतु प्रवाशांचा रोष पाहता रविवार वेळापत्रक रद्द करण्यात आले.

बिघाडाच्या घटना

’ २१ मे रोजी आंबिवली ते टिटवाळा दरम्यान रुळाला तडा गेल्याची घटना घडली. तेव्हापासून मध्य रेल्वेवर लोकल गाडय़ांचा मोठा गोंधळ होतच राहिला.

’ २६ मे रोजी कुर्ला स्थानकात रात्री नऊला एका लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून घसरले.

’ २८ मे रोजी कळवा येथे दुपारी एक वाजता सिग्नल बिघाड झाला.

’ ५ जून रोजी सकाळी पाचच्या सुमारास डोंबिवलीजवळ सिग्नल बिघाड यासह मोठे बिघाड होतच राहिले.

वक्तशीरपणा ढासळला

मध्य रेल्वेचा एप्रिलमध्ये ९० टक्क्यांचा वर असलेला वक्तशीरपणा जूनपासून ८५ ते ९० टक्क्यांच्या आत आला आहे.