मुंबईत करोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. मुंबईत अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर वाढणाऱ्या मृत्यू संख्येवरही त्यांनी चिंता व्यक्ती केली. “मुंबईकरांनी वेळ दवडू नये. प्रथम महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये यावं. नंतर हवं तर शिफ्ट व्हावं. विलंब करू नका. याचं विलंबामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. कुणावरही मृत्यू ओढवू नये म्हणून आम्ही काम करत आहोत,” असं पेडणेकर म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौर किशोर पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वच नेत्यांनी जनतेच्या हिताच्या बाजूने मांडलं. त्यांच्या पलिकडे जाऊन बघितलं, जीव वाचवणं इतकंच लक्ष्य असणं आता गरजेचं आहे. आवश्यक आहे. आर्थिक बाजू कुमकुवत होत असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. पण, प्रत्येकाला याची तीव्रता कळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निर्णयाला पोहोचण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रमुख म्हणून ते त्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. प्रत्येकाला आर्थिक विवंचना प्रत्येकाला आहे, पण जीव वाचणं महत्त्वाचं आहे,” असं महापौर म्हणाल्या.

“रेल्वेचे दोन हजार ८०० बेड्स तयार आहेत. वरळीत एनआयसीएमध्ये बेड्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०० बेड्स ऑक्सिजनचे असतील. त्यामुळे दोन ते अडीच हजार बेड्स त्वरित तयार होतील. कांजूरमार्गलाही पाहणी करतोय. दोन हजार बेड तयार केले जात आहे. मुंबईकरांना आवाहन आहे की, तुमच्या वॉर्डमध्ये वॉररुममध्ये तुमची नोंदणी करा. जिथे बेड उपलब्ध असेल, तो बेड दिला आहे. यात चॉईस ठेवू नका. चॉईस ठेवल्यामुळे वेळ जातोय. तब्येत खालावल्यामुळे… कालच्या दिवसात ५० जणांचा मृत्यू झाला. मला वाटत ही धोक्याची मोठी सूचना आहे. ही त्सुनामी आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेली लाट सप्टेंबरला गेली. पण, आता ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईकरांनी वेळ दवडू नये. प्रथम महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये यावं. नंतर हवं तर शिफ्ट व्हावं. विलंब करू नका. याचं विलंबामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. कुणावरही मृत्यू ओढवू नये म्हणून आम्ही काम करत आहोत,” असं पेडणेकर यांनी सांगितलं.

“महापालिकेची परिस्थिती चांगली नसली, तरी तयारी ठेवावी लागणार आहे. मजूर वर्ग, गरिबांना मदत करण्यासंदर्भात महापालिकेनं तयारी सुरू केली आहे. स्वयंसेवी संस्थांनाही आवाहन आहे. परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिलं आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सोय करणं अवघड आहे. परीक्षा नंतरही घेता येईल, जीव महत्त्वाचे आहेत,” असं महापौर म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai lockdown update mayor kishori pednekar covid 19 beds and icu bmh
First published on: 11-04-2021 at 12:02 IST