मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस ९ जानेवारी २०२० पासून १५ डब्यांची धावणार आहे. आठ डब्यांच्या वातानुकूलित डबल डेकरला तात्पुरते असलेले सात डबे कायम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळणार आहे.

२०१५ मध्ये एलटीटी ते मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र त्यासाठीचे प्रीमियम प्रवास दर, गाडीची वेळ यामुळे प्रवाशांनी डबल डेकरडे पाठच फिरवली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ही गाडी मडगावपर्यंत चालवण्यात आली. तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने आठ डब्यांची गाडी सहा डब्यांची करण्यात आली. तसेच  गाडीची वेळही बदलली. त्यानंतर प्रवाशांचा थोडा प्रतिसाद वाढू लागला. त्यामुळे पुन्हा डबल डेकर गाडी आठ डब्यांची केली. गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात याच गाडीला आणखी सात वातानुकूलित डबे तात्पुरत्या स्वरुपात जोडले. आता हेच डबे कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डबल डेकर एक्स्प्रेस १५ डब्यांची धावणार आहे.

जोडण्यात येणाऱ्या सात डब्यांमध्ये ट्रेन ११०८५ व ११०८६ एलटीटी-मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसला पाच वातानुकूलित थ्री टियर व दोन वातानुकूलित टू टियर डब्यांचा समावेश आहे. एलटीटी येथून सुटणाऱ्या गाडीसाठी ९ जानेवारी पासून व मडगाव येथून १० जानेवारी २०२० पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. ट्रेन ११०९९ व १११०० डबल डेकर एक्स्प्रेसलाही असेच डबे जोडले जातील. यात एलटीटीपासून सुटणाऱ्या गाडीला ११ जानेवारी व मडगाव येथून सुटणाऱ्या गाडीला १२ जानेवारी २०२० पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या अतिरिक्त डब्यांचे आरक्षण २ डिसेंबर २०१९ पासून सुरू होणार आहे.