मुंबई महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये आहेत तरीही दर पावसाळ्यात मुंबई पाण्यात गेलेली दिसते असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. मुंबई महापालिकेने मनात आणलं तर इथला समुद्र किनाराही अत्यंत नितळ अगदी काचेसारखा होऊ शकतो. मॉरिशसमध्ये आहे अगदी तसाच स्वच्छ दिसू शकतो असेही त्यांनी म्हटले.

एवढंच नाही तर इटलीप्रमाणे मुंबईतही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली पाहिजे असेही मत गडकरी यांनी व्यक्त केले. मी मुंबईत कमी येतो तरी मी स्वतःला एक मुंबईकर समजतो असेही गडकरी यांनी म्हटले आहे. विदर्भातले पाच जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होतील असेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

अंदमान आणि निकोबारनंतर देशांतर्गत भागात पहिलं कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे. पश्चिम उपनगरातील गोराई या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार आहे. याच उद्यानाचं भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचवेळी त्यांनी महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये आहेत तरीही मुंबई पावसळ्यात का बुडते असे विचारत मुंबई महापालिकेला टोला लगावला आहे. या कार्यक्रमाला मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान दिल्लीतल्या प्रदूषणावरही गडकरी यांनी भाष्य केलं. नवीन प्रदूषण नियंत्रण योजनेमुळे दिल्लीचं प्रदूषण २६ टक्क्यांनी कमी झालं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत पावसामुळे चांगलीच दाणादाण उडालेली पाहण्यास मिळाली. रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच अनेक सखल भागांमध्ये पाणीही साठलं होतं. या सगळ्याकडे लक्ष वेधत नितीन गडकरी यांनी महापालिकेला फिक्समध्ये असलेल्या ५८ हजार कोटींची आठवण करुन दिली. आता यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.