हरयाणामध्ये भाजप नेत्याच्या मुलाने एका तरुणीचा पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतही अशाच स्वरुपाची घटना समोर आली आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. नितीशकुमार शर्मा (वय३६) असे या आरोपीचे नाव आहे.

मुंबईत फॅशन डिझायर म्हणून काम करणारी महिला रविवारी रात्री वीरा देसाई मार्गावरुन कारमधून घरी परतत होती. या दरम्यान नितीशकुमार शर्मा हा त्या महिलेचा तिचा पाठलाग करु लागला. महिलेच्या निवासस्थानापर्यंत शर्माने तिचा पाठलाग केला. महिलेच्या इमारतीबाहेर कार पार्क करुन तो तिथे बराच वेळ थांबूनही होता. संबंधीत महिलेला हा प्रकार लक्षात आला आणि तिने या घटनेप्रकरणी आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेने आवाज उठवताच नितीशकुमार शर्मा तिथून पळून गेला.

आंबोली पोलिसांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी नितीशकुमार शर्माचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. संबंधीत महिलेने फेसबुकवर तिचा अनुभव शेअर केला. ‘दिल्लीपेक्षा मला मुंबई महिलांसाठी जास्त सुरक्षित वाटायची. पण रविवारी रात्री एका व्यक्तीने माझा पाठलाग केला. माझ्या घराबाहेर तो थांबला होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाची भावनादेखील नव्हती’ असे त्या महिलेने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.