मुंबईमधील सांताक्रुझ येथील शास्त्री नगर भागामध्ये एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या आत्महत्येमागील वेगळच कारण समोर येत आहे. घरच्यांनी या मुलाला लळा लागलेला बोकड काही महिन्यांपूर्वी विकल्याने केल्याने या तरुण मागील काही दिवसांपासून निराश होता. याच निराशेमधून त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव नदीम खान असं असल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. नदीमने बुधवारी सकाळी नायलॉनच्या दोरीने घरामध्येच गळफास घेतला. बराच वेळ दरवाजा वाजवूनही नदीम दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या बहिणीने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना नदीम नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला. शेजारच्यांच्या मदतीने नदीमला खाली उतरवून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेत्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

काही महिन्यांपूर्वी नदीमच्या आईने त्याचा आवडता बोकड विकला होता. तेव्हापासूनच नदीम हा उदास होता. करोनामुळे घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने घर चालवण्यासाठी नदीमच्या आईने हा बोकड विकला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरु आहे.