मुंबईत पुन्हा एकदा ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ अर्थात दारु पिऊन कार चालवताना इतरांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आलिशान बीएमडब्ल्यू कार दामटत होता. कार चालवताना नियंत्रण जात असल्याने त्याने चार इतर वाहनांना धडका दिल्या, यात २ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या कार चालकाला थांबवण्यासाठी चार किमीपर्यंत पाठलाग केला आणि त्याला थांबवले. रे रोड ते किडवाई मार्ग या दरम्यान हा प्रकार घडला.


पोलिसांच्या माहितीनुसार, मेहमुद आलम असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. आलमला थांबवण्यासाठी त्याच्या कारचा आम्ही ४ किमीपर्यंत पाठलाग केला आणि त्याला थांबवले. संबंधीत बीएमडब्ल्यू कारच्या मालकाचा तो चालक आहे. त्याचा मालक शनिवारी कामानिमित्त दुबईकडे रवाना झाला त्यानंतर हा प्रकार घडला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आलमवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी पाठलाग करुन मद्यधुंद चालकाला थांबवले दरम्यान, रस्त्यावर असलेल्या संतप्त स्थानिक नागरिकांनी या चालकाला कारमधून बाहेर ओढत मारहाणही केली. त्याचबरोबर त्याच्या बीएमडब्ल्यू कारचीही मोडतोड केली. मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.