शेजारी राहणाऱ्या मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हॉटेल कर्मचाऱ्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पीडित मुलीच्या पोटातील बाळाचा पिता आरोपी नसल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

२५ वर्षीय आरोपी १७ महिने तुरुंगात होता. मुलीच्या पोटातील बाळ आरोपीचे नाही, हे डीएनए चाचणीतून सिद्ध झाल्यानंतर त्याला जामीन मिळाला. डीएनएच चाचणीचा अहवाल आणि दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी विशेष मुलांच्या शाळेत शिकते. २३ जुलै २०१९ रोजी शाळेत असताना तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली, कुटुंबीय मुलीला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे ती गर्भवती असल्याचे समजले.

मुलीला जेव्हा, याबद्दल घरच्यांनी विचारले, तेव्हा तिने शेजाऱ्याने आपल्यावर दोन वेळा बलात्कार केल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन आरोपपत्र दाखल केले.

आरोपीने याआधी सुद्धा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण तपास सुरु असल्यामुळे तो अर्ज फेटाळण्यात आला. डीएनए रिपोर्ट अनुकूल आल्यानंतर आरोपीने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला व चुकीच्या पद्धतीने आपल्याला या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगितले.

फिर्यादी पक्षाने आरोपीच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. जामीन मंजूर झाला, तर आरोपी पुराव्यांशी छेडछाड करु शकतो असा फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. पण डीएनए रिपोर्टमधून मुलीच्या पोटातील बाळाचा पिता आरोपी नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.