मुंबईमधील साकीनाका येथे घडलेल्या अमानवीय बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर मुंबईमधीलच विलेपार्ले येथे घडलेली आणखीन एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आठवडाभरापूर्वी मुंबई पोलिसांनी पुण्यामधून एका ४२ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. ४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीने २ सप्टेंबर रोजी आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली. १ सप्टेंबर रोजी हा आरोपी जामीनावर बाहेर आला होता. आरोपी तुरुंगामध्ये असताना त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं होतं. मात्र याबद्दल त्याची सासू त्याला काहीच माहिती देत नसल्याने या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामधूनच त्याने सासूची हत्या केल्याची माहिती समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे साकीनाका प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही आरोपीने महिलेच्या गुप्तांगामध्ये वस्तू घुसवून तिची हत्या केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास विलेपार्ले पूर्वेतील हनुमान रोड येथील पितळेवाडीमध्ये हे हत्याकांड घडलं. मरण पावलेल्या महिलेचं नाव शामल सिंगम असं असून ती तिची मुलगी लीनासोबत राहत होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी इक्बाल शेखला अटक केली असून तो विलेपार्लेमधील बामनवाडा येथील रहिवाशी आहे. इक्बाल आणि लीनाचं २०११ साली लग्न झालं होतं. या दोघांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुलं आहेत.

इक्बालला १ सप्टेंबर रोजी पुण्यातील येरवाडा तुरुंगामधून सोडण्यात आलं होतं. दहिसरमध्ये साखळीचोरीप्रकरणी इक्बालला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली. शिक्षा पूर्ण करुन इक्बाल बाहेर आल्यानंतर तो लीनाला भेटण्यासाठी गेला. मात्र लीनाच्या घरी गेल्यावर त्याला तिथे शामल यांनी लीनाने दुसरं लग्न केलं असून तिला ११ महिन्यांचा एक मुलगा आणि तसेच ती आता पुन्हा गरोदर आहे अशी माहिती इक्बालला दिली. “त्याने लीनाला दुसऱ्या पतीला सोडून पुन्हा आपल्याकडे येण्यासंदर्भात धमकी दिली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लीना आणि त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी गेला असता लीना आईच्या घरी नव्हती हे त्याच्या लक्षात आलं,” अशी माहिती विलेपार्ले पोलिसांनी दिलीय.

इक्बालने शामल यांच्याकडे लीना आणि मुलं कुठे गेली याबद्दल विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. यावरुन त्यांच्यावर वाद झाला. “रागाच्या भरात त्याने टाइल्स आणि चाकूने सासूवर वार केला,” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना शामल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यांमध्ये पडलेला आढळून आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच शामल यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकूने हल्ला केल्यानंतर इक्बालने सासूच्या गुप्तांगामध्ये बांबू घालून तिचे आतडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कलम ३७७ म्हणजेच अनैसर्गिक अत्याचाराचेही कलम आरोपीविरोधात लावले आहे.

इक्बाल शेखला येरवडा तुरुंगात सोडण्यात आल्याने तो हत्येनंतर पुन्हा पुण्यात गेल्याची शक्यतेनुसार पोलिसांनी त्याचा माग घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या खबरीने दिलेल्या माहितीनुसार इक्बाल पुण्यामध्येच होता. “इक्बाल शेखला भोसरीमधून अटक करण्यात आली,” असं सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी सांगितलं आहे. पोलिसांनी इक्बालने आपली ओळख बदलून नाशिक किंवा आंध्र प्रदेशमध्ये राहण्याची तयारी केली होती असा दावा केलाय. इक्बालचे वडील आंध्र प्रदेशमध्ये राहत असल्याने तो तिकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. “इक्बालविरोधात २८ गुन्ह्यांची नोंद असून आठ प्रकरणांमध्ये तो दोषी आढळून आलाय,” असं पोलीस निरिक्षक रजेंद्र काणे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. इक्बालला दोनदा मुंबईमधून तडीपारही करण्यात आलं होतं. चोऱ्या, साखळी चोरी आणि हल्ले करणे या गुन्ह्यांखाली त्याच्याविरोधात तक्रारी दाखल आहे. आता त्याला हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय.