ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस ग्राहकांमध्ये वाढत आहे. एका क्लिकवर घरपोच वस्तू मिळत असल्यानं ग्राहकांची ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. पण, ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्याची शेकडो प्रकरणं समोर आली असताना आता मुंबईतील एका तरुणाला देखील असाच वाईट अनुभव आला आहे. फ्लिपकार्ट या अग्रगण्य वेबसाईटवरून या तरूणानं आयफोन ८ मागवला होता, यासाठी ५५ हजार त्याने मोजले पण, प्रत्यक्षात मात्र मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या त्याला मिळाल्या असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात संबधीत तरुणानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून फ्लिपकार्टनं देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं मान्य केलं आहे.

या तरुणाचं नाव तबरेज नागरली असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तबरेजनं २२ जानेवारीला फ्लिपकार्टवरून आयफोन ८ मागवला होता. यासाठी त्याने तब्बल ५५ हजार रुपये मोजले होते. पण जेव्हा त्यानं बॉक्स उघडून पाहिला त्यावेळी मात्र यात आयफोन नसून साबणाच्या वड्या होत्या. तबरेजनं मुंबईच्या भायखळा पोलीस स्टेशनमध्ये फ्लिपकार्टविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फ्लिपकार्टनं देखील तबरेजची माफी मागितली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन कंपनीकडून त्याला देण्यात आलं आहे.