दोन वर्षापूर्वीच रेल्वे पोलिसांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास बंद केला. ट्रेन अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगत पोलिसांनी प्रकरण गुंडाळले. मात्र या मुलाच्या वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यू अपघातात झाला नसून हत्या असल्याची खात्री होती. म्हणूनच त्यांनी दुबईमधील नोकरी सोडून दोन वर्षे या प्रकरणाचा तपास केला. आणि अखेर दोन वर्षांनंतर आपल्या मुलाचा खून हा एका मोबाइल फोनसाठी झाल्याचे सिद्ध करुन दाखवत अल्पवयीन आरोपींना पकडून दिले. एखाद्या सिनेमाची पटकथा शोभावी अशी ही खरीखुरी कथा आहे दोन वर्षांपूर्वी वयाच्या १४ व्या वर्षी मरण पावलेल्या मोहम्मद खान आणि त्याच्या मृत्यूचा यशस्वी तपास करणारे त्याचे वडील शब्बीर खान यांची.

आठ महिने शब्बीर यांनी स्वत: एकट्याने वेगवेगळ्या प्रकारे या प्रकरणाचा तपास केला. शब्बीर यांनी मोहम्मदच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी वसई रोड रेल्वे पोलिसांना एक पत्र लिहून या प्रकरणातील सर्व पुरावे सादर केले आहे. या पुराव्यांच्या आधारे मोहम्मदच्या मृत्यूप्रकरणी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई रोड पोलीस या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चारही मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करणार आहेत. अटक करण्यात आलेल्या मुलांनी मोहम्मदला त्याच्याकडील नवीन मोबाईल मिळवण्यासाठी ट्रेनसमोर ढकलल्याचे शब्बीर यांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून सिद्ध झाले आहे. या चार पैकी तिघेजण १५ वर्षांचे तर एक जण १६ वर्षाचा आहे.

काय आहे प्रकरण

दोन मुली, पत्नी आणि मुलगा मोहम्मदबरोबर शब्बीर मीरा रोड येथील पुजा नगरमधील राहत होते. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी संध्याकाळी मोहम्मद त्याच्या मित्राबरोबर खेळण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळील मैदानावर गेला. मात्र त्यानंतर मोहम्मद पुन्हा कधी घरी परतलाच नाही. मोहम्मदच्या मित्राकडे त्याच्याबद्दल चौकशी केली असता त्याने आम्ही दोघे एकत्रच घराकडे आल्याची माहिती खान कुटुबियांना दिली. कुटुबियांनी मोहम्मद हरवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. दुसऱ्या दिवशी मोहम्मदचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्याच्या धक्कादायक बातमीने खान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी काही दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास बंद करुन मोहम्मदचा अपघाती मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मित्राबरोबर घराकडे परत आल्यानंतर मोहम्मद सेल्फी काढण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेला असता रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

वडिलांना सुरु केला तपास 

मात्र पोलिसांनी केलेला तपास आणि मोहम्मदच्या मृत्यूचे कारण त्याचे वडील शब्बीर यांना काही पटले नाही. त्यांनी स्वत: या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय घेतला. पेशाने ड्रायव्हर असलेल्या साबरी यांनी त्यासाठी त्यांनी दुबईमध्ये काही महिन्यांपूर्वीच मिळालेली नवीन नोकरीही सोडून दिली. जेव्हा शब्बीर यांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी त्यांना मोहम्मदचे मित्र संध्याकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी परत आल्याचे व्हिडीओत दिसले. यामुळे आपल्यापासून काहीतरी लपवले जात असल्याची खात्री शब्बीर यांना पटली. जेव्हा शब्बीर यांनी त्या मुलाबरोबर घडलेल्या प्रकरणाबद्दल संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मुलगा जोरात रडू लागला. त्याच्या पालकांनीही शब्बीर यांना आपल्या मुलाला घडलेल्या घटनेचा जबर धक्का बसला असल्याने त्याच्याशी संवाद साधू नये असे सांगितले. काही महिन्यांनंतर त्या मुलाने, आपण मोहम्मदचा अपघात होताना पाहिले असल्याची कबुली दिली. तसेच तो अपघात नसल्याचेही त्याने सांगितले. त्या मुलाने स्थानिक मुलांना त्रास देणाऱ्या त्यांच्याच वयाच्या काही मुलांची नावे शब्बीर यांना सांगितली. त्यावेळी शब्बीरला मोहम्मदने या मुलांबद्दल आपल्याकडे तक्रार केल्याचे आठवले. मात्र मुलांमधील वाद असेल असा विचार करुन शब्बीरने त्याकडे दूर्लक्ष केले होते. त्यानंतर शब्बीर यांनी त्या मुलांशी संवाद साधला तेव्हा प्रत्येकजण घडलेल्या घटनेची वेगळी माहिती देत असल्याने शब्बीरने सर्वांबरोबरचे संभाषण रेकॉर्ड केले. काही मुलांनी मोहम्मद चर्चगेटकडे जाणाऱ्या ट्रॅकवर उभा होता असं सांगितलं तर काहींनी विरुद्ध दिशेला जाणाऱ्या ट्रॅकवर तो उभा असल्याचं म्हटलं. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये कमालीचा विरोधाभास होता. तसेच मोहम्मदला शब्बीरने वाढदिवसाच्या दिवशी दिलेला मोबाइल फोन त्याच्या मृत्यूनंतर हरवला होता. तरी तो फोन सुरु असल्याची माहिती पोलिसांनी शब्बीरला दिली. जर अपघात झाला असता तर तो फोन ट्रॅकवरच पडून असता.

आठ महिने स्वत: तपास केल्यानंतर मिळालेले पुरावे शब्बीर यांनी एक पत्र लिहून मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात रेल्वे पोलीस आयुक्तांकडे पाठवले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास केला असता मोहम्मद आणि इतर चार मुलांमध्ये झालेल्या वादविवादानंतर मोहम्मदचा मृत्यू झाला. मोहम्मद त्याच्या मित्राबरोबर खेळण्यासाठी गेला असता या चार आरोपी मुलांनी त्याला गाठले. त्यापैकी एका मुलाने त्याच्याकडे मोबाइल देण्याची मागणी केली. मात्र मोहम्मदने नकार दिल्याने त्या मुलांनी त्याला मारहाण करुन त्याचा मोबाइल आणि वाढदिवसासाठी त्याला देण्यात आलेले पैसेही ताब्यात घेतले. मोहम्मदने विरोध केला असता त्यांनी त्याला येणाऱ्या लोकलसमोर ढकलले. त्यातच मोहम्मदचा मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये समोर आले.

या सर्व प्रकरणानंतर आता दोन वर्षींनी वसई रोड पोलिसांनी या चारही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मला माझा मुलगा तर परत मिळणार नाही. मात्र त्याला न्याय जरुर मिळेल असे मत शब्बीरने ‘मीड डे’ वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.