‘दी चिल्ड्रन्स एड सोसायटी’च्या अखत्यारित असलेल्या मानखुर्द बालसुधारगृहात काही दिवसांपूर्वी एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. मात्र उपचार सुरू असताना आठ दिवसांपूर्वी त्याचा शीव रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर सुधारगृहातील २६८ मुलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यातील ८४ मुलांमध्ये लक्षणे आढळून आल्याने, त्यांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २९ गतिमंद मुलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापेकी काही मुलांना बीकेसीमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या करोनाग्रस्त विशेष मुलांवर डॉक्टर अनोख्या पद्धतीनं त्यांच्यासोबत खेळ खेळत उपचार करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

महिला आणि बालविकास विकास विभागानं आपल्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. करोना रुग्णांसाठी तहानभूक हरपून काम करणारे डॉक्टर करोना पॉझिटिव्ह गतिमंद मुलांकडे विशेष लक्ष देत आहेत. तसंच विशेष मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासोबत खेळ खेळत, या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन स्टाफ यांच्याशी खेळत, संवादातून त्यांना समजून घेत त्यांच्यावर उपचार करत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, मुलांच्या प्रकृतीवर डीन ढेरे तसंच महिला आणि बालविकास विभागही लक्ष ठेवून आहे.

‘दी चिल्ड्रन्स एड सोसायटी’च्या अखत्यारित असलेल्या मानखुर्द बालसुधारगृहात मुलांना करोनाची बाधा झाल्याची बाब रविवारी ही समोर आली. त्यानंतर पालिकेने संपूर्ण बालसुधारगृह कुलूपबंद करून कर्करोग असलेल्या दोन मुलांना तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केलं. तर उर्वरित मुलांना विलीगिकरण केंद्रात दाखल केले आहे. सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे डॉक्टर्स दिवसरात्र तहान , भूक विसरून करोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे. तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारीही अहोरात्र सेवेत झटताना आपल्याला दिसत आहेत.