मंत्रालयातील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरीभाऊ भुसारे यांनी केला आहे. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. मंत्रालयातील सुरक्षारक्षकांना त्याने चावा घेतल्याने त्याला इजा झाली आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. या शेतकऱ्याविषयी; तसेच या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

गारपिटीत या शेतकऱ्याने स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट आणि पॉलिहाऊसच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी त्याने स्थानिक कृषी विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीत दिली जाणारी मदत ही फक्त पिकांसाठी दिली जाते, असे त्याला कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पुढील वर्षासाठी या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून शेडनेटसाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार डिसेंबर, २०१६ मध्ये त्याची निवड होऊन वर्क ऑर्डरसुध्दा देण्यात आली आहे. मात्र, आर्थिक अडचणीचे कारण देत त्याने ही संधी वापरली नाही. त्याला बँकेतून कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. मात्र, बँकेने २५ टक्के रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, आपल्याकडे पैसे नाहीत असे त्याने सांगितले, असेही मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करताना सांगितले. शेतकरी आणि या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रालयातील पोलिसांकडून मारहाण झालेल्या रामेश्वर भुसारी या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.