अनेक हौशी मॅरेथॉनपटू रुग्णालयात दाखल; निर्जलीकरणाचा त्रास

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे ही समाधानाची बाब असली तरीही, रुग्णालयात दाखल होणाऱ्या स्पर्धकांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षी १४ स्पर्धक रुग्णालयात दाखल झाले होते तर, या वर्षी ही संख्या १७ वर पोहोचली आहे. यापैकी दोघे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत तर, एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १४ धावपटूंना निर्जलीकरण, अस्थिभंग, हायपरकेलेमिया अशा गोष्टींना सामोरे जावे लागले.

शरीराबरोबरच मानसिक सुदृढतेची परीक्षा पाहणारी मॅरेथॉन अपुरा सराव, अयोग्य आहार, इत्यादी कारणांमुळे जीवावर बेतते आहे. मॅरेथॉन दरम्यान १३५० धावपटूंना प्रथमोपचारांची गरज भासली. हृदयरोगाचे ८१ रुग्ण यंदा सहभागी झाले होते. मात्र त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली नाही. यातील ६५ जण ड्रीमरनमध्ये, १५ जण अर्धमॅरेथॉनमध्ये आणि एक जण पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. तीव्र निर्जलीकरणामुळे १९ धावपटूंवर उपचार करावे लागले.

मॅरेथॉन हा क्रीडाप्रकार असला तरी त्याकडे बऱ्याचदा छंद म्हणून पाहिले जाते. एखाद्या क्रीडापटूप्रमाणे याकरिता तयारी करावी लागते. आहाराकडेही लक्ष द्यावे लागते. याशिवाय सरावही महत्त्वाचा असतो. मात्र या सगळ्याची काळजी न घेता कमी कालावधीत धावण्याचा सराव करून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि प्रसंगी जीवही गमवावा लागतो.  मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे हौशी ज्येष्ठ नागरिक सर्वाचे लक्ष वेधून घेत असतात. वृद्धापकाळात त्यांनी दाखवलेल्या ऊर्जेचे सर्वत्र कौतुक होते. मात्र शरीराला नैसर्गिक ताकदीपेक्षा अधिक ताण दिल्याने रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे असे प्रकार घडतात. हौस म्हणून पुरेशा तयारीअभावी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे तरुण धावपटूही याला अपवाद नाहीत.

‘मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नुसता उत्साह पुरेसा नाही. त्यासाठी प्रशिक्षण, शारीरिक सुदृढता आणि वैद्यकीय मार्गदर्शन गरजेचे आहे,’ असे एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे डॉ. विजय डिसिल्व्हा यांनी सांगितले. ‘पूर्वी माणूस भटकं ती करत होता, तेव्हा एका वेळी २५ किमी चालण्याची क्षमता त्याच्यात होती. मात्र उत्क्रांतीनंतर माणसाच्या शरीरात अशी क्षमता राहिली नाही. वर्षांनुवर्षे सराव केल्यानंतरच शेकडो किलोमीटर धावण्याची क्षमता शरीरात निर्माण करता येते. यासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनापासूनच धावण्याचा सराव असावा. अचानक चाळिशी-पन्नाशीत दोन-तीन महिने सराव करून मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ नये.

तंबाखूसेवन, वजन अशा गोष्टींवर नियंत्रण असावे. रक्तदाब, मधुमेह, इत्यादींची औषधे सुरू असल्यास ती कमी प्रमाणात घ्यावीत. आदल्या दिवशी खूप पाणी प्यावे, चांगली झोप घ्यावी, प्रथिनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खावेत,’ असे डॉ. विजय सुरासे यांनी सांगितले.

मॅरेथॉनपटूंची वाढलेली संख्या

वर्ष               संख्या

२०१८          ४४,४०७

२०१९          ४६४१४

२०२०          ५५३२२