२४ तासांत साडेपाच कोटी रुपये भरा; फलकांचे शुल्क न भरल्याने पालिकेची आयोजकांना नोटीस

रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यासाठी स्पर्धकांची जोरदार तयारी सुरू असतानाच या स्पर्धेच्या मार्गात मात्र अडथळा उभा राहिला आहे. स्पर्धेच्या निमित्ताने  ठिकठिकाणी लावलेल्या फलकांचे तब्बल पाच कोटी ४८ लाख रुपयांचे शुल्क आयोजकांनी पालिकेकडे अद्याप भरलेले नाहीत. ही रक्कम २४ तासांत न भरल्यास फलक झळकावून मुंबईचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी आयोजकांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

शहरात उद्या, रविवारी ‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर जाहिरात फलक झळकविण्यासोबत लेजर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव यापोटी पाच कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ रुपये पालिकेकडे भरणे आवश्यक आहे. ही रक्कम भरण्याबाबतचे पत्र पालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षकांनी यापूर्वीच आयोजकांना दिले आहे. मात्र, आयोजकांनी ही रक्कम न भरताच मॅरेथॉनची तयारी सुरू केली आहे. त्यावर आक्षेप घेत पालिकेने आयोजकांना २४ तासांत ही रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. नियोजित मुदतीमध्ये ही रक्कम न भरल्यास संबंधित आयोजकांवर मुंबई विद्रूपीकरण, तसेच अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात येईल, असे ‘ए’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

‘सन बर्न’ला परवानगी नाकारली

दरम्यान, आयोजकांनी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘सन बर्न’कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. ‘सनबर्न’ चाहत्यांना आम्हाला नाराज करायचे नाही. त्यामुळे आमचे व्यवस्थापकीय संचालक पोलीस आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांशी ‘सन बर्न’बाबत संवाद साधत आहेत, असे ‘सन बर्न’च्या आयोजकांकडून सांगण्यात आले.

मॅरेथॉनचा प्रकार आणि मार्ग

  • ’पूर्ण मॅरेथॉन : ४२.१९५ किमी..
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राजीव गांधी सागरी सेतू ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • ’अर्ध मॅरेथॉन : २१.०९७ किमी.. वरळी डेअरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • ’ड्रीम रन : ६ किमी.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान
  • ’ज्येष्ठ नागरिक धाव : ४.३ किमी.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान
  • ’दिव्यांगांसाठी शर्यत : १.७५ किमी.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फ्लोरा फाऊंटन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

संवादाने मार्ग काढणार!

पालिका सुरुवातीपासून स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉनचा भाग राहिली आहे. त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय सलग १३ वर्षे मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन शक्य नव्हते. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. पालिकेच्या संबंधित विभागासोबत नोटिशीबाबत संवादाने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.