पंचावन्न हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पण याच दरम्यान मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्याने ६४ वर्षांच्या गजानन माजलकर यांचा मृत्यू झाला. धावत असतानाच माजलकर खाली कोसळले, त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. माजलकर हे ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमधून धावत होते अशी माहिती आहे. याशिवाय अन्य सात जणांनाही धावताना हृदयाचा त्रास जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, मुंबई मॅरेथॉनमधल्या महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला आहे. हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पारुल चौधरीनं पहिला क्रमांक पटकावलाय, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आली आहे. याशिवाय नाशिकच्या मोनिका आथरेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या गटात तीर्थ पुन याने पहिला क्रमांक पटकावला. मान सिंग दुसरा तर बिलाम्पाला तिसरा क्रमांक मिळाला.