अमिताभ बच्चन, हरभजन सिंग स्पर्धेचे दूत

सतत धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईकरांसाठी धावण्याची संधी निर्माण झाली आहे. निमित्त आहे ‘परिनी जुहू १० के रन’ या स्पर्धेचे!  जुहू विलेपार्ले जिमखाना क्लबच्या रनर्स क्लबकडून रविवारी, १३ मार्चला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नियमित वेगवेळ्या स्पर्धाध्ये भाग घेणारे धावपटू, उत्तम आरोग्यासाठी धावणारे यांपासून प्रथमच स्पर्धेत भाग घेणारे असे सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त धावपटू यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन व क्रिकेटपटू हरभजन सिंग हे या स्पर्धेचे दूत असून त्यांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीचा प्रसार करणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.   आजकाल कामाच्या निमित्ताने सर्वाची धावपळ होत असते. परंतु, आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन ते सांभाळण्याच्यादृष्टीने मात्र बहुतेकजण आळस करत असतात. बदललेली जीवनशैली, खाण्याच्या व कामाच्या न ठरलेल्या वेळा यामुळे आरोग्याची होत असलेली हेळसांड प्रत्येकाला जाणवतच असते.आता मात्र येत्या रविवारी होणाऱ्या या स्पर्धेत आपल्या पदचापल्याची चाचपणी करण्याची संधी सर्वाना मिळणार आहे.  यात १० किलोमीटर व ५ किलोमीटर अशा गटांमध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना पदके  व रोख रकमांच्या स्वरुपात पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटीक संघटनेकडून स्पर्धेला मान्यता मिळाली असल्याने स्पर्धकाला स्पर्धा पूर्ण करण्यासाठी लागलेल्या वेळेचे प्रमाणपत्रही दिले जाणार असून या स्पर्धेचे प्रमाणपत्र देशातील धावण्याच्या इतर स्पर्धासाठी पात्र ठरणार आहे.