मुंबई : राज्य सरकारने मान्यता दिल्याप्रमाणे विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात यावी तसेच ही वाढ सप्टेंबर २०२० पासून लागू करावी, अशी मागणी मुंबई मार्डने पालिकेकडे केली आहे. अन्यथा सर्व डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशाराही मार्डने पालिकेला दिला आहे.

मुंबईच्या तत्कालीन आयुक्तांनी करोनाकाळात सेवा देणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन दरमहा देण्याचे जाहीर केले. हे मानधन विद्यार्थ्यांना दिले जात होते. दरम्यान राज्य सरकारने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करत विद्यावेतनात सप्टेंबर २०२० मध्ये दहा हजार रुपये वाढ केली. परंतु मुंबई पालिकेने राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ लागू केली नाही. यावर मार्डने वारंवार मागणी केल्यानंतर आता १२ मार्चला वेतनवाढीला मंजुरी दिली. परंतु ही वेतनवाढ सप्टेंबरपासून न देता १ मेपासून दिली असून करोनाकाळात दिलेले वाढीव वेतन हेच विद्यावेतनवाढ आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, करोना काळात वर्षांपेक्षाही अधिक काळ अखंड सेवा जीव धोक्यात घालून आम्ही देत आहोत. परंतु पालिकेने ऐनवेळी आपली भूमिका बदलून ३००० निवासी डॉक्टरांची फसवणूक केली आहे. तेव्हा शासनाने दिलेली वेतनवाढ सप्टेंबरपासून देण्याचा निर्णय सात दिवसांत न झाल्यास सर्व डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले आहे.