पाच वर्षांपूर्वी मुंबई – पुण्यात थमान घालणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’नंतर आता एमईआरएसचा विषाणू भारतात पसरण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आह़े या नव्या विषाणुजन्य आजाराची साथ सध्या दक्षिण आशियात पसरली आहे आणि मुंबईला या विषाणूचा सर्वाधिक धोका आह़े  त्यामुळे स्वाइन फ्लूचा धुमाकूळ अनुभवलेल्या महापालिकेने या संभाव्य संकटाशी लढण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे.
सौदी अरेबियातील एका रुग्णाला सप्टेंबर २०१२ मध्ये एमईआरएस (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हा आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आतापर्यंत या आजाराचे जगभरात ८५ रुग्ण आढळले असून त्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या स्वाइन फ्लूच्या विषाणूप्रमाणेच एमईआरएस हा विषाणू संसर्गजन्य आहे. एमईआरसीमुळे ताप, कफ तसेच श्वसन करताना त्रास जाणवतो. मात्र टॅमी फ्लूने तो बरा होत नाही. त्यावरील उपचारपद्धती अजूनही निश्चित झालेली नाही.
मध्य आशिया आणि अतिपूर्व आशियात एमईआरएस विषाणूची साथ पसरली आहे. सध्या सुरू असलेल्या रमजान या पवित्र महिन्यासाठी तसेच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातून लाखो भाविक तेथे जात असल्याने त्यांच्यामार्फत हा विषाणू देशात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या भागात नोकरीसाठी गेलेल्या नागरिकांच्या मार्फतही हा विषाणू पसरू शकतो. मात्र, विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना अजूनही राज्य सरकारने दिलेल्या नाहीत.  
‘एमईआरएस या विषाणूबाबत राज्य शासनाकडून माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य आशियातून आलेल्या रुग्णांना श्वसनाचा आजार आढळल्यास त्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येईल़  तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात येईल. मात्र आतापर्यंत मुंबईत असा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे अतिरिक्त महानगरपालिका मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.

एमईआरएस लक्षणे
*     श्वास घेण्यास त्रास, ताप, पडस़े
*     व्यक्तींच्या निकट संपर्कातून पसरतो.
प्रतिबंधात्मक उपाय
*     हात वीस सेकंद साबण्याच्या पाण्याने किंवा ‘अल्कोहोल सॅनिटायझर’ने धुवा़
*     डोळे, नाक व तोंडाला हाताने स्पर्श करणे टाळा.
*     एकमेकांची भांडी वापरू नका़
*     खोकताना व शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर ते कचऱ्याच्या डब्यात टाका.
(यावर कोणतीही लस उपलब्ध नाही़)