केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीवनस्तर निर्देशांकात शहरांच्या यादीमध्ये मुंबईने तिसरा क्रमांक पटकावल्यानंतर मुंबईच्या नावे आणखीन एक विक्रम होणार आहे. देशातील सर्वात जास्त खड्डे असणारे शहर म्हणून मुंबईची नोंद व्हावी यासाठी मुंबईकरांनीच कंबर कसली आहे. एका आगळ्यावेगळ्या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुंबईकरांनी रस्त्यांवरील २० हजारहून अधिक खड्ड्यांची माहिती गोळा केल्याचा दावा मोहिम सुरु करणाऱ्या नवीन लाडे यांनी दिली आहे.

आरपीआयचे नेते असणाऱ्या नवीन लाडे यांनी मुंबईमधील खड्ड्यांची माहिती द्या असं आवाहन सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केलं होतं. या आवहानाला उत्तर म्हणून मुंबईकरांनी चक्क २० हजारहून अधिक खड्ड्यांची माहिती लाडे यांच्याकडे पोहचवली आहे. याच माहितीच्या आधारे लाडे यांनी सर्वाधिक खड्डे असणारे शहर म्हणून मुंबईची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय प्रकरणांमध्ये गिनीज बुक काहीही करु शकत नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. तरी निराश न होता त्यांनी अशाच प्रकारचा अर्ज लिमका बुककडे आणि इंडिया बुककडे केला आहे. सामाजिक उपक्रम या विषयाअंतर्गत हा अर्ज लिमका बुकने स्वीकारला असून येणाऱ्या अवृत्तीमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याचे लिमका बुकमार्फत सांगण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांकडे गांभीर्याने पाहणे आता काळाची गरज आहे. आम्ही लाडे यांच्या उपक्रमाला सामाजिक उपक्रम म्हणून पुर्णपणे पाठिंबा देत असल्याचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या ए. के. चॅटर्जी यांनी सांगितले. या मोहिमेमुळे समाजजागृती होईल आणि प्रशासनावर खड्डे बुजवण्यासाठी दबाव येईल अशीही आशा चॅटर्जी यांनी व्यक्त केली.

मुंबईमध्ये दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना आपले प्राण गमावतात. दरवर्षी ही समस्य उद्भवते आणि त्यावर सरकारी यंत्रणा कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे दर पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. म्हणूनच आता रेकॉर्ड बुकमध्ये गेल्यावर तरी प्रशासनाला जागं येईल अशी आशा बाळगून हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लाडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. खड्ड्यांची माहिती मिळवण्यासाठी लाडे यांनी ‘मुंबई पॉटहोल्स डॉटकॉम’ नावाची वेबसाइटही त्यांनी सुरू केली आहे. तर लाडेंच्या टीमने मुंबईमध्ये महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या ४०० खड्ड्यांचे जीओ टॅगिंगही केले आहे.

लाडे यांनी तयार केली टीम

मिळणारा प्रतिसाद पाहून लाडे यांनी आपली एक टीम तयार केली आहे. या टीमला त्यांनी रायझिंग स्टार असे नाव दिले असून या टीमच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भातील विविध कामे केली जातात. यामध्ये मुंबईकरांनी पाठवलेल्या खड्ड्यांचे फोटोंचे ठिकाण प्रत्यक्षात जाऊन बघून येणे, या मोहिमेसंदर्भात जनजागृती करणे, सोशल मिडियाच्या माध्यमातून ही मोहिम अधिक अधिक मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. हे लोक मोटरसायकल वरून मुंबईतील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरून तेथील खड्ड्यांची चाचपणी कऱण्याबरोबरच ज्यांना या मोहिमेबद्दल माहिती नाही त्यांना यासंदर्भातील सर्व माहिती देतात.