सध्या विविध राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायद्याच्या चर्चांचा जोर आला आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील नेतेमंडळींमध्ये द्वंद्व रंगल्याचे दिसत असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

प्रार्थनास्थळांसंदर्भातील वक्तव्यावर स्पष्टीकरण

प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच करोना रुग्ण वाढले असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं. या आपल्या वक्तव्याचा भाजपाकडून विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मी केवळ प्रार्थनास्थळे म्हटले नव्हते, तर बार आणि इतर गर्दीच्या ठिकाणी जाण्यानेही करोना वाढला कारण लोक करोनाबाबत गंभीर नाहीत, असं पेडणेकर म्हणाल्या.