तृतीय पुण्यतिथीनिमित्त घोषणेची शक्यता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात करण्याचे निश्चित झाले असून त्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेत त्याची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. स्मारकाच्या उभारणीचे सर्वाधिकार किंवा ट्रस्टच्या निर्णयप्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण नियंत्रण असावे, ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुद्दय़ावर स्मारकाचे काम अडले असून शिवसेना आणि ठाकरे यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे ठाकरे आठ-दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न सोडवून तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने स्मारकाची घोषणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पावले टाकत असल्याचे समजते. स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या समितीने चार-पाच जागा सुचविल्या होत्या. दादर येथील महापौर बंगला, नायगाव आणि दक्षिण मुंबईतील जागाही सुचविण्यात आली आहे. त्यापैकी उद्धव ठाकरे सांगतील, ती जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि शिवसेनेच्या दृष्टीने दादर आणि शिवाजी पार्क परिसराला खूपच महत्व आहे. त्यामुळे स्मारक त्याच परिसरात व्हावे, अशी ठाकरे यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने महापौर बंगला हीच जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
हे स्मारक शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणारे व भव्यदिव्य असावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी स्मारकासाठीची जागा समिती किंवा ट्रस्टला देऊन उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्मारकाचे काम व्हावे, त्यादृष्टीने वास्तुविशारद व अन्य सदस्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात, असा शिवसेनेचा आग्रह आहे. विधानसभेसाठी युती तुटल्यापासून गेले वर्षभर शिवसेना व भाजपमध्ये अनेक मुद्दय़ांवरुन खणाखणी सुरु असून संबंध ताणले गेले आहेत.
बिहार निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाल्याने शिवसेना अधिक आक्रमक होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेशी चांगले संबंध रहावेत आणि सरकार भक्कम रहावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी सरकारने जलदगतीने पावले टाकून भूमीपूजनही केले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
शिवसेना सत्तेत असताना शिवसेनाप्रमुखांचे स्मारक तीन वर्षे रखडल्याने शिवसेना नेते नाराज असून तृतीय पुण्यतिथी निमित्ताने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करीत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची दिवाळीनंतर भेट घेणार असून त्यावेळी स्मारकाबरोबरच अन्य काही विषयांवरही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.