मुंबई महापालिका, म्हाडा, सरकारी आस्थापने यांच्या एकूण ४४३ इमारती अतिधोकायक स्थितीत आहेत अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. फोर्ट भागातल्या सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. या बैठकीत महापालिकेसह म्हाडाचे अधिकारीही उपस्थित होते.

मुंबईत सध्या महापालिका, म्हाडा, सरकारी आस्थापने यांच्या एकूण ४४३ इमारती या अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या इमारती कोणाच्याही असो, त्याबाबत आता ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत, कोणीही जबाबदारी झटकून चालणार नाही असेही आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.

मुंबईतल्या अतिधोकादायक इमारती
महापालिका – ५६
सरकारी – २७
खासगी ३६०
एकूण ४४३

मुंबईत गेल्या आठवड्यात फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीचा भाग कोसळल्याने जी दुर्घटना घडली त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईत ४४३ इमारती अतिधोकादायक आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.