मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याची तसंच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.

“जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे असून त्या दिशेने पावलं चालली आहेत. लॉकडाउन राज्य सरकारलाही नको आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच नको आहे. पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असेल तर नियम पाळायलाच हवे. आपण याआधीही रुग्णसंख्या शून्य करुन दाखवली आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

“जगात दुसरी लाट तीव्रतेने आलेली दिसत आहे. लोकांनी घाबरु नये, पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत, पण त्याचा अर्थ कसंही वागा आणि रुग्णसंख्या वाढावी असं होत नाही. शेवटी कोणताही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, संरक्षणार्थ असणार आहे. उगाच घ्यायचा म्हणून निर्णय घेणार नाही,” असं आश्वासन त्यांनी दिलं.

“करोनावर राजकारण सुरु असून जनतेला उकसवलं जात आहे. याआधीच्या लॉकडाउनमध्ये जनतेने चांगली साथ दिली. गेल्या एक वर्षात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पण शेवटी वाचलो तरच लढू शकतो. पृथ्वीतलावर राहिलो तर आपण सगळं करु शकतो. त्यासाठी राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही निर्णय घेत आहेत. त्यावर राजकारण होता कामा नये. केंद्रातून काही मदतही मिळत नसून प्रतिकूल परिस्थिती आहे,” असंही महापौर म्हणाल्या आहेत.