मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्या घरीच विलिगीकरणात राहणार आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
“मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.”

दरम्यान महापौर बंगल्यावरच्या सगळ्या म्हणजेच ४० कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये फक्त महापौर करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यापासून महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. रुग्णालयांना भेटी देणं, आरोग्य सुविधांचा आढावा घेणं या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. अनेकदा करोना हेल्थ सेंटरलाही भेटी देऊन तिथली स्थिती त्यांनी जाणून घेतली. मुंबईत काय काय उपाय योजना करण्यात येतील, करोनाचा प्रतिबंध कसा करता येईल यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गृह विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांना करोनाची लक्षणं दिसत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या स्वॅब टेस्टचाही अहवाल येणार आहे.