मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आपला मुक्काम हलवावा लागणार आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यामध्ये महाडेश्वर यांना वास्तव्य करावे लागणार असून जानेवारीच्या अखेरीस महापौर आपल्या कुटुंबासह राणीच्या बागेतील बंगल्यात दाखल होणार आहेत.

राज्य सरकारने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्मारकाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे महाडेश्वर यांना महापौर बंगला रिकामा करावा लागणार आहे. मलबार हिल येथील जलअभियंत्यांचा बंगला महापौरांना उपलब्ध करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. या बंगल्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. तसेच मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीचे काम नजीकच्या काळात हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा बंगला महापौरांना देण्याबाबत प्रशासनाकडून असमर्थता दर्शविण्यात आली होती. राणीच्या बागेतील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड वास्तव्यास होते. महापौर पदाला साजेल असा बंगला उपलब्ध करावा, अशी मागणी करीत महाडेश्वर यांनी बंगल्यात जाण्यास नकार दिला होता. प्रशासनाने  वास्तव्याची व्यवस्था केली नाही, तर स्वत:च्या निवासस्थानी निघून जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र आता ‘मातोश्री’चे आदेश मिळताच महाडेश्वर यांनी राणीच्या बागेतील बंगल्यात राहण्याची तयारी दर्शविली आहे. १० दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. जानेवारीअखेरीस महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहण्यास येतील.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे आपण जानेवारीच्या अखेरीस शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा करून राणीच्या बागेतील बंगल्यात वास्तव्यास जाणार आहोत.

-विश्वनाथ महाडेश्वर, महापौर