महापौरांचा इशारा

गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी करुन दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले होते. पण मुसळधार पावसात मुंबई जलमय झाली त्याचे खापर मात्र प्रशासनावर फोडून शिवसेना मोकळी झाली होती. आताही महापौर स्नेहल आंबेकर यांनी पावसाळ्यात मुंबई जलमय झाल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल असा इशारा दिला आहे. सत्ताधारी या नात्याने शिवसेना-भाजपला प्रशासनावर अंकूश ठेऊन नालेसफाईची कामे करुन घेता येत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या नालेसफाईची पाहणी करुन उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी सफाईच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले होते. आता मात्र महापौरांनी घुमजाव केले आहे. मागील वर्षी नालेसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला होता आणि त्यामुळे मुंबईतील सखलभाग जलमय झाले होते, अशी कबुलीच स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे. प्रशासनाकडून नालेसफाई समाधानकारक झाल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात. तरी ऐन पावसाळ्यात परिस्थिती वेगळीच असते. मुंबईत पाणी तुंबल्यानंतर नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी नालेसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे वरळी कोळीवाडा येथील क्लिव्हलॅण्ड उदंचन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकले नाही. परिणामी, पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी नालेसफाईचे काम व्यवस्थित होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात हिंदमाता परिसरात मोठय़ा प्रमाणावर पावसाचे पाणी साचते.

त्याचा निचरा व्हावा यासाठी ब्रिटानिया उदंचन केंद्राचे काम सुरू आहे. मात्र ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. सांताक्रूझ येथील गझदरबांध उदंचन केंद्राचे कामही अपूर्णावस्थेत आहे. ही उदंचन केंद्रे या पावसाळ्यात कार्यान्वित होणे गरजेचे आहे, असे स्नेहल आंबेकर यांनी या पत्रात म्हटले आहे. यावर्षी नालेसफाईच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे स्पष्ट करीत महापौरांनी प्रथमदर्शनी नालेसफाईची समाधानकारक कामे झालेल्या नाल्यांची आयुक्तांसमवेत पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदा मुंबई जलमय झाली आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांची असेल, असा इशाराही स्नेहल आंबेकर यांनी अजोय मेहता यांना या पत्रात दिला आहे.