पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती हिटलरप्रमाणे असल्याचे वक्तव्य करणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांकडून कानउघाडणी होताच महापौरांनी या वक्तव्याबाबत घूमजाव केले.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करते. पण काही वेळा त्यांची कार्यपद्धती हिटलरप्रमाणे भासते. एखाद्या व्यक्तीच्या हाती सत्ता आल्यानंतर असे घडणारच, असे स्नेहल आंबेकर यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनाही अडचणीत आली होती. या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या महापौरांच्या मदतीला स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी धाव घेतली होती. महापौर असे काहीच बोललेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण ही मंडळी देत होती.
भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्नेहल आंबेकर यांच्याशी संपर्क साधून मोदींबाबत केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला; परंतु आपण तसे काहीच बोललेलो नाही. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी कोटक यांना सांगितले.