बेळगाव येथील सुमारे २५ लाख मराठी सीमावासियांच्या लढय़ाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईचे महापौर सुनिल प्रभु सोमवारी सकाळी बेळगावला जात आहेत. बेळगाव येथे आयोजित केलेल्या सीमावासियांच्या महामेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. बेळगाव- महाराष्ट्र सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना सोमवारी कर्नाटक सरकार विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे आयोजित केले आहे.
बेळगाव महापालिकेत ५८ पकी ३३ नगरसेवक महाराष्ट्र एकीकरण समितीचे असताना अजून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षाची नेमणूक झाली नाही. बेळगाव येथील सीमावासीयांना न्याय मिळविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाब टाकण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक पंढरी परब यांनी दिली.
बेळगावच्या मराठी सीमावासीयांच्या लढय़ाला शिवसेनाप्रमुखांचा नेहमीच पािठबा होता. त्यामुळे शिवसेना नेहमीच आमच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली आहे. या मेळाव्याला उपस्थित राहून शिवसेनेने आमच्या लढय़ाला आपला पाठिंबा दर्शवावा, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण मराठी भाषिक समितीचे आमदार संभाजीराव पाटील, आमदार अरिवद पाटील आणि बेळगाव पलिकेतील गटसचिव पंढरी परब आणि त्यांच्यासह ३३ नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटून केल्याचे परब यांनी सांगितले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महापौर या मेळाव्याला जात आहेत़