भाजपकडून वारंवार मुंबई महानगरपालिकेत माफियाराज असल्याची टीका केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजॉय मेहतांना पत्र लिहिले आहे. महापालिकेत खरंच माफियाराज आहे का ?, असा प्रश्न या पत्रातून महापौरांनी आयुक्तांना विचारला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेकदा शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत माफियाराज असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजप खासदार किरीट सौमय्यांनी वारंवार माफियाराज शब्दाचा वापर करत शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. दसऱ्यावेळी किरीट सोमय्यांनी माफियाराजचे दहन करण्याचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवसेनेने गोंधळ घातला होता. आता याच माफियाराजवरुन शिवसेनेच्या महापौरांनी थेट आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

‘आयुक्त अजॉय मेहता प्रशासकीय विभागाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी पालिकेत माफियाराज आहे का, या प्रश्नाचे उत्तर द्यावे’, असे महापौर स्नेहन आंबेकर यांनी म्हटले आहे. महापौर पत्राला काय उत्तर देणार, याबद्दल उत्सुकता असल्याचेही आंबेकरांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात आयुक्तांची गोची झाल्याचे दिसत आहे.

भाजपचे खासदार किरीट सौमय्या आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून वारंवार पालिकेच्या कारभारावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. राज्यातील सत्तेत भागीदार असलेली शिवसेना भाजपवर टीका करत असताना मुंबई महापालिकेत भाजपकडून तशाच प्रकारचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे भाजपच्या माफियाराज या आरोपात तथ्य आहे का, असा प्रश्न शिवसेनेच्या महापौरांकडून आयुक्त मेहतांना विचारण्यात आला आहे.