मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) वृक्ष प्राधिकरणासमोर २२३२ झाडं कापण्याचा तसंच ४६९ झाडं पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शिवसेनेकडून या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. मात्र भाजपाने या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. भाजपा आणि तज्ञ सदस्यांच्या मदतीने महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून लोकांचा होत असलेला विरोध आणि मागणी लक्षात घेता शिवसेनेकडून वारंवार या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. याआधी सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांना पाहणी दौरा केला होता. यावेळी त्यांनी एमएमआरसीकडून चार वर्षांपुर्वी झाडं लावण्यात आली होती, मात्र त्यापैकी फक्त ३० टक्केच जगली असं सांगितलं होतं.

शहरात पायाभूत सुविधा किंवा इतर प्रकल्पांसाठी झाडं कापायची असल्यास वृक्ष प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक आहे. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने प्राधिकरणाकडे कोणीही स्वतंत्र तज्ञ नसल्याने कामकाजावर स्थगिती आणली होती. पाच स्वतंत्र तज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जून महिन्यात ही स्थगिती उठवण्यात आली. याशिवाय त्यांच्या समितीत नगरेसवकदेखील आहेत. महापालिका आयुक्त या समितीचे प्रमुख आहेत.