आरे कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवरून शिवसेनेची नाराजी ओढवून घेतलेल्या अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटविण्यात आले. मात्र, त्यांची अन्यत्र नियुक्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी रणजित सिंग देओल यांनी मुंबई मेट्रोचा कार्यभार स्वीकारला आहे. परंतु मुंबई मेट्रो रेल परिवारानं अश्विनी भिडेंना मानाचा मुजरा केला आहे. मेट्रो परिवरानं एक पत्र लिहित त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.

२०१५ पासून आपण मेट्रो-३ या प्रकल्पासाठी काम करत आहात. हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यासाठी आपल्या चित्तात अखंड तेवणारी ध्येयवादाची ज्योत आणि अतिशय कमी प्रमाणात मनुष्यबळ असलेली प्रारंभीची सामग्री हाती घेऊन आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. तुटपुंजे मनुष्यबळ हाती घेऊन हे विकासकाम करणं कसोटी पाहण्याचं होतं. परंतु आपण खंबीर राहिलात. प्रकल्प पुढे कसा जाईल यासाठी योजना आखून त्या कार्यान्वित करण्यात आपण आनंद मानला. हे अतिशय स्पृहणीय आहे, असं त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रात मेट्रो परिवारानं म्हटलं आहे.


आपण कायमच मी हे केलं म्हणण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ही कामे झाली आणि होत आहेत, असं म्हणत संघभावना जोपासली. आपलं अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, मनमिळावू वृत्ती, काम करण्याची जिद्द, कामाप्रतीचा प्रमाणिकपणा आणि प्रचंड मेहनतीची तयारी या गुणांचा आदर्श गेत संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग घडू लागला आहे. शून्यातून आपण मेट्रो -३ प्रकल्पाचं विश्व निर्माण केलं. अशा प्रभावशाली कार्यशैली, उत्कृष्ट प्रशासक, कणखर नेतृत्व आणि अजोड गुणवत्ता असलेल्या मेट्रो वूमनला मानाचा मुजरा असं म्हणत या पत्रातून अश्विनी भिडे यांच्या कार्याला मेट्रो परिवाराकडून सलाम करण्यात आला आहे.