News Flash

Mumbai Metro 3 : माहीम ते शिवसेना भवन पर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

मेट्रोचं ३५ टक्के भुयारीकरण झालं; दिलेल्या वेळेत मेट्रो येणार सेवेत

माहीम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीननी (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रु) पूर्ण करण्यात आले आहे. आज दादर येथील शिवसेनाभवन पर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे.

कृष्णा १ आणि २ या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लाँचिंग शाफ्ट माहीम येथून अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १८ ऑक्टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर माहीम पासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर २४९० मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा – १ या टीबीएमसाठी १७७९ इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्स चा वापर करण्यात आला. कृष्णा २ या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी २४७२ मीटर भुयारीकरणासाठी १७६६ इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा १ व २ द्वारे सरासरी दररोज १० ते १२ मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.

या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या १०० जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठलाय. कृष्णा १ आणि २ हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे व त्याची लांबी १०८ मीटर इतकी असून हे प्रत्येकी ४०० टन इतक्या वजनाचे आहे.

याप्रसंगी मुं. मे. रे. कॉ. च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व १७ टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि १८ किमी पेक्षा अधिक म्हणजेच एकूण ३५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी दिलेल्या वेळेत आम्ही मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्वास आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:44 pm

Web Title: mumbai metro 3 mahim to shivsena bhavan tunneling complete
Next Stories
1 ‘पबजी’वर बंदी घाला, मुंबईतील विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2 CID फेम अभिनेत्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने विलेपार्ले स्थानकात निधन
3 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दोन तास बंद
Just Now!
X