एकाच वेळी अनेक रस्त्यांवरील कामांमुळे वाहतूक कोंडी

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी मुंबईकराच्या पाचवीला पुजलेली असली तरी आता कोणत्याही वेळी मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यातील खड्डय़ांसोबतच मुंबई मेट्रोच्या विविध प्रकल्पांची कामे एकाच वेळी अनेक रस्त्यांवर सुरू असल्याने मुंबईचा वाहतूक वेग मंदावला आहे. बोरिवली-दहिसरकडे वा मुलुंड-चेंबूरकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर सायंकाळी वाहनांच्या लाबंच लांब रांगांमुळे मुंबईकरांना घरी पोहोचण्यास नेहमीपेक्षा तास ते दीड तास अधिक लागत आहे.

सकाळच्या वेळेला मध्य आणि दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहोचण्यासाठी खासगी वाहने, रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर आदींच्या रांगा दिसतात तशाच त्या सायंकाळीही उत्तर मुंबईत जाताना दिसतात. अगदी बंपर-टू-बंपर वाहने मुंगीच्या वेगाने सरकताना दिसत. दररोजचेच हे दृश्य आहे. उड्डाणपुलांच्या जाळ्यामुळे वांद्रे वा सायन येथे वेगाने पोहोचणारी वाहने बोरिवली वा मुलुंड-ठाणे येथील पुढील प्रवासासाठी किती वेळ लागेल हे ठामपणे सांगता येत नाही. बोरिवलीकडे जाण्यासाठी प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती मार्गाचा बहुसंख्येने वापर केला जातो. वरळी-वांद्रे सागरी मार्गाने वेगाने येणारी वाहने वांद्रे जंक्शनवर रखडत आहेत. सांताक्रूझ येथील उड्डाणपुलापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागत आहे. त्यानंतर अंधेरी उड्डाणपुलापर्यंत वाहतूक थोडी फार सुरळीत असली तरी नंतर बोरिवलीपर्यंतचा विलंबाचा प्रवास सुरू होतो.

अंधेरी उड्डाणपुलावरून गोरेगावपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा अर्धा ते पाऊण तास नंतर पुढे प्रत्येक उड्डाणपुलापर्यंत पोहोचण्यासाठी असाच विलंब लागत असल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे इतर वेळी असलेल्या चार ते पाच लेन तीनवर आल्या आहेत. त्यातच बेलापूर-वाशीकडून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडमार्गे येणाऱ्या वाहनांची भर पडत आहे. त्या तुलनेत पूर्व द्रुतगती मार्ग सुलभ असला तरी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरही काही प्रमाणात मेट्रो रेल्वेची कामे आणि मोठय़ा प्रमाणात पडलेले खड्डे आदींमुळे वाहनांची कोंडी ही नित्यनेमाचीच झाली आहे.

बोरिवली-दहिसरकडे जाण्यासाठी पश्चिम उपनगरात लिंकिंग रोड पूर्वी महत्त्वाचा होता. परंतु या लिंक रोडवरही मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे नेहमी ३५ मिनिटे लागणाऱ्या प्रवासासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागत आहे.