आपत्कालीन स्थितीत सुरक्षा नियंत्रक विभागाशी थेट संपर्क

घाटकोपर-अंधेरी-वसरेवा असा मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रो वनकडून सुरक्षा अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘मेट्रो सिक्युअर’ नावाने असलेल्या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत मेट्रोच्या सुरक्षा नियंत्रण कक्षाशी थेट संवाद साधता येणार आहे. या अ‍ॅपचे गुरुवारी अनावरण करण्यात आले.

घाटकोपर-अंधेरी-वसरेवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रोच्या १२ स्थानकांत मिळून ७००पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक तसेच सामान तपासणी यंत्रणा आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांसाठी आणखी उपाययोजना करण्यासाठी मेट्रो वनने ‘मेट्रो सिक्युअर’ हे अ‍ॅप उपलब्ध केले आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत या अ‍ॅपचा फायदा होईल. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी छायाचित्र किंवा व्हिडीओ काढण्यासाठी अ‍ॅपमधील उपलब्ध बटणावर क्लिक करू शकतात. छायाचित्र किंवा व्हिडीओ काढून डीएन नगर येथील मेट्रोच्या सुरक्षा नियंत्रक कक्षात पाठवू शकतात. याचबरोबर मेट्रो ट्रेन आणि त्याचे स्थानही प्रवासी पाठवू शकणार आहेत. त्यानंतर प्रवाशाला नियंत्रण कक्षातून फोन येईल आणि प्रवाशाकडून त्याची माहिती घेऊन त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

अ‍ॅपची वैशिष्टय़े

  • कुटुंब तसेच मित्रांना आपत्कालीन संदेश पाठवण्याची सुविधा.
  • मेट्रोमार्गाचा वापर करत नसल्यासही सुविधा कार्यरत
  • अ‍ॅपमधील ‘जीपीएस प्लॉटिंग’ आणि ‘लाइव्ह सव्‍‌र्हेलन्स’ यंत्रणेच्या साह्याने घटनास्थळावरील दृश्ये सुरक्षा विभागाला पाठवण्याची सुविधा.