पहिल्या दिवसापासूनच लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आणि मुंबईकरांना सुखद प्रवासाचा अनुभव देणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही ‘मेट्रो-१’ आज, सोमवारी एक वर्षांची होणार आहे. गेल्या वर्षभरात नऊ कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबई ‘मेट्रो-१’चा वाढदिवस दरवर्षी ‘मेट्रो दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून यंदा पहिल्याच ‘मेट्रो दिना’ची धामधूम शनिवारपासूनच सुरू झाली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीनही दिवशी प्रवाशांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून रविवारी सकाळी गतिमंद मुले आणि निराधार ज्येष्ठ नागरिक यांना मेट्रोचा खास प्रवास घडवण्यात आला.
वर्सोवा ते घाटकोपर हे ११ किलोमीटरचे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी मुंबईकरांचा किमान तास-दीड तास खर्ची होत होता. मात्र ‘मेट्रो-१’ सुरू झाल्यावर हे अंतर केवळ २४ मिनिटांत कापणे शक्य झाले. त्यामुळे गेल्या वर्षी ८ जून रोजी मेट्रोच्या पहिल्याच दिवसापासून मेट्रोला भरभरून प्रतिसाद मिळाला.
मेट्रोने दर दिवशी प्रवास करणाऱ्यांची संख्या सध्या अडीच लाख एवढी आहे. तर गेल्या वर्षभरात ९.२ कोटींहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला. ‘मुंबई मेट्रो-१’च्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई मेट्रोवनने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात रविवारी सकाळी मुंबईतील ‘विशेष’ मुलांसाठीच्या एका शाळेतील विद्यार्थी व पालकांसाठी आणि दोन वृद्धाश्रमांतील वृद्धांसाठी खास ‘जॉय राइड’ हा कार्यक्रम झाला. त्याव्यतिरिक्त मेट्रोच्या अंधेरी आणि घाटकोपर या दोन प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मेट्रोच्या वैशिष्टय़ांबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

मेट्रो आणि आकडय़ांचा खेळ

* वर्षभरातील फेऱ्या – १३२२४८ फेऱ्या

* कापलेले अंतर – अंदाजे १४ लाख किमी.

* दर दिवसाची प्रवासी संख्या – २.६३ लाख

* वर्षभरातील प्रवासी – ९.२ कोटी