‘मुंबई मेट्रो’च्या तिकीट दरात होणाऱ्या प्रस्तावित भाडेवाढीच्या याचिकेवरील अंतिम सुनावणी २० जूनपासून दररोज होणार आहे. त्यामुळे भाडेवाढही तोपर्यंत टळली आहे.
मुख्य न्यायमूर्ती डी. एच. वाघेला आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस या प्रकरणी करण्यात आलेल्या विविध याचिकांवर अंतिम सुनावणीची गरज असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने २० जून रोजीपासून दररोज प्रकरणाची सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी केंद्रीय कायदा संबंधित असल्याने अंतिम सुनावणीच्या वेळेस अॅटर्नी जनरल यांना उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय भाडेवाढीबाबत दिलेला दिलासाही न्यायालयाने तोपर्यंत कायम ठेवला आहे. जुलै महिन्यात दर निश्चिती समितीने अहवाल दिल्यानंतर एमएमआरडीने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ करता येत नाही. तरीही २७ नोव्हेंबर रोजी ‘मेट्रो वन’ने पाच रुपयांच्या भाडेवाढ जाहीर केली होती. त्यामुळे त्या विरोधात एमएमआरडीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती.