प्रकल्पासाठी भूखंड तातडीने देण्याचे मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला आदेश

कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्पास विरोध करून त्याचा राजकीय फायदा उठविण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आदेशान्वये जोरदार धक्का दिला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा देण्यास नकार देण्याचा मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने केलेला ठराव रद्द करताना मेट्रोसाठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेस दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोची आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचे शिवसेनेचे मनसुबे उधळले गेल्याचे बोलले जात आहे.

कुलाबा- वांद्रे- सिप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या, आणि सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबईतील पहिल्याच भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम पुढील महिन्यात सुरू होत आहे. मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक जागा देण्यास मुंबई महापालिकेने नकार दिल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या मेट्रो प्रकल्पावरून सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. भाजपने प्रकल्पाचे समर्थन करीत, सन २०१९पर्यंत ही मेट्रो सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तर, या मेट्रोमुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होत असल्याचा, तसेच आरे कॉलनीत मेट्रो कारशेडमुळे झाडांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करीत शिवसेनेने या प्रकल्पाविरोधात आवाज उठविला .

या प्रकल्पाच्या विरोधाचाच एक भाग म्हणून मेट्रोसाठी आवश्यक भूखंड देण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेने बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेऊन भाजपवर कुरघोडी केली होती. महासभेच्या निर्णयानुसार प्रशासनानेही हे भूखंड मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला हस्तांतरित करण्याबाबत असमर्थता दाखविली होती. त्यामुळे मेट्रोचे काम दिरंगाईने सुरू होण्याची शक्यता होती.

१७ भूखंड तात्पुरत्या स्वरूपात, २४ कायमस्वरूपात

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला आवश्यक सर्व जागा त्वरित हस्तांतरित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिले. मेट्रोसाठी १७ भूखंड तात्पुरत्या स्वरूपात, तर २४ भूखंड कायम स्वरूपात मेट्रो कार्पोरेशनला हस्तांतरीत करावेत असे आदेशच नगरविकास विभागाने सोमवारी महापालिकेस दिले. त्यामुळे मेट्रोच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला असून हे काम आता निर्धारित वेळत सुरू होईल, अशी माहिती नगरविकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

प्रकरण नेमके काय?

  • कुलाबा- वांद्रे- सिप्झ या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो रेल्वेचे काम पुढील महिन्यात सुरू होणे अपेक्षित.
  • या प्रकल्पासाठी भूखंड देण्यास शिवसेनेचा विरोध. महापालिकेत तसा ठराव करून प्रकल्पाची, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न.
  • हा ठराव रद्द करून, आवश्यक भूखंड हस्तांतरित करण्याचे नगरविकास खात्याचे महापालिकेस सोमवारी आदेश.