पालिका अधिकाऱ्यांची चिंता; आयुकतांचे कारवाईचे निर्देश

वाहतुकीला गती मिळावी, रेल्वेवरील प्रवाशांचा ताण हलका व्हावा या उद्देशाने मुंबईत ‘मोनो’ आणि ‘मेट्रो’ रेल्वे जाळे उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामांमुळे पावसाळ्यात रस्ते जलमय होण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांनी मासिक आढावा बैठकीत व्यक्त केली. परिणामी, ‘मोनो’ आणि ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी दिले.

‘मोनो’ आणि ‘मेट्रो’ रेल्वेच्या निमित्ताने मुंबईकरांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा, रेल्वेवरील ताण हलका व्हावा, प्रवासाला गती मिळावी या उद्देशाने मुंबईत अनेक ठिकाणी ‘मोनो’ आणि ‘मेट्रो’चे जाळे उभारण्यात येत आहे. ‘मेट्रो’ प्रकल्पासाठी भूगर्भ चाचणीचे, तर काही ठिकाणी प्रकल्पाआड येणारे मोठे वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठमोठे लोखंडी पत्रे उभे करून रस्ता अडविण्यात आला आहे. ‘मोनो’ प्रकल्पातील रेल्वे स्थानकाची कामे काही ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.  अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अजोय मेहता यांनी ‘मोनो’ आणि ‘मेट्रो’ प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.