शहरातील वाहतुकीच्या प्रमुख साधनांचा बोजवारा उडाल्याने मंगळवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी दु:स्वप्न ठरला. आज सकाळपासून सुरू असलेल्या ट्रेनच्या गोंधळानंतर संध्याकाळी मुंबई मेट्रोलाही पावसाचा फटका बसल्याचे समोर आले. पावसामुळे मेट्रोच्या डी.एन.नगर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून मेट्रोची वाहतूक रखडली आहे. यामध्ये भरीस भर म्हणजे कुर्ला ते घाटकोपर आणि सायन ते पनवेल या रस्तेमार्गावरील वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला आहे. याशिवाय, पवईजवळ मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे वृत्त आहे. सकाळपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची सेवा अजूनही पूर्ववत झाली नसून ट्रेन्स १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.