08 March 2021

News Flash

मुंबईची दुसरी ‘लाइफलाइन’

मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरत आहे ती मेट्रो!

दररोज सुमारे ७५ लाख प्रवाशांना आपल्या पोटात घेऊन साधारणपणे २,१५० उपनगरीय रेल्वे गाडय़ा मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर धावत असतात. जिथे मुंगी शिरायलासुद्धा जागा नसते, अशा उपनगरीय रेल्वे गाडय़ांतून लाखो चाकरमानी जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करीत असतात. त्यातून कधी गाडीतून पडून किंवा ट्रॅक ओलांडताना अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवाशांचे लोंढे इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम ३४०० बेस्ट बसेस आणि ४८ हजार टॅक्सी आणि एक लाख रिक्षा करीत असतात. या शिवाय हजारो खासगी गाडय़ांचीही वर्दळ मुंबईच्या रस्त्यावर असते. या सर्व वाहतूक कोंडीतून निर्माण होणारे प्रदूषण आणि या सर्व संकटांचा सामना करीत इच्छित स्थळी पोहचण्याचा करावा लागणारा द्राविडी प्राणायाम मुंबईकरांच्या पाचविलाच पुजलेला आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरत आहे ती मेट्रो!

मुंबईसारख्या दाटीवाटीच्या, गजबजलेल्या आणि मोकळ्या जागेची वाणवा असलेल्या शहरात मेट्रोसारखे प्रकल्प उभारणे हे काही वर्षांपूर्वी दिवास्वप्न होते. मात्र वर्सोवा ते घाटकोपर या ११.४ किमी लांबीच्या मेट्रोने मुंबईकरांचे स्वप्न जून २०१४ मध्ये सत्यात उतरविले. मग मेट्रोच्या गारेगार नि आरामदायी प्रवासाच्या स्वप्नाने उपनगरीय रेल्वेशी समांतर अशा मेट्रो रेल्वेच्या ‘लाइफलाइन’च्या स्वप्नाने मुंबईकरांना खुणावायला सुरुवात केली. देशाच्या आर्थिक राजधानीस आणि जागतिक व्यापार केंद्रास साजेशा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच प्रामुख्याने या महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उदयास आलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(एमएमआरडीए) गेल्या काही वर्षांत या प्रदेशाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पट्टय़ातील सर्वच शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याबरोबरच आरामदायी आणि सुखकारक प्रवासाची हमी देणाऱ्या मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यातूनच एक लाख कोटी रुपये खर्चून वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर, दहिसर- डीएननगर- वांद्रे- मंडाले, कुलाबा- वांद्रे- सिप्झ, वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली, ठाणे- भिवंडी- कल्याण, स्वामी समर्थनगर-  जोगेश्वरी- कांजूरमार्ग- विक्रोळी, अंधेरी (पूर्व)- दहिसर (पूर्व), वडाळा- मुख्य टपाल कार्यालय (सीएसटीएम), अंधेरी (पूर्व)- वांद्रे (पूर्व), दहिसर (पूर्व)- मीरा-भाईंदर अशा  विविध ११ मार्गाच्या माध्यमातून महानगर प्रदेशात १७२ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले जात असून  पुढील पाच ते दहा वर्षांत उपनगरीय रेल्वेवरील भार हलका होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होईल, यात शंका नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:43 am

Web Title: mumbai metro second life line of mumbai
Next Stories
1 ‘भुयारीमार्गाचा धोका नाही!’
2 शहरबात : पुरानंतर मुंबईकर जिंकले; पण पालिका हरली..
3 आठवडय़ाची मुलाखत : भाडेकरूकेंद्री पुनर्विकास होण्यासाठी चर्चा हवी!
Just Now!
X