मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर पहिल्या वर्षांत एकाही बिघाडाविना धावलेल्या मुंबई मेट्रो वनला अखेर रेल्वेच्या बिघाडांचे वारे लागले. बुधवारी मेट्रोमार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मेट्रोची सेवा तब्बल तासभर विस्कळीत झाली. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी स्थानकाजवळच मेट्रोमार्गावर हा बिघाड झाल्याने रेल्वेच्या बिघाडांची लागण मेट्रोला झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती. या बिघाडादरम्यान वर्सोवा ते विमानतळ रस्ता या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. अखेर सव्वासहाच्या सुमारास सेवा पूर्ववत झाली.
मेट्रोच्या पहिल्याच वर्षांत मेट्रोने अक्षरश: सर्वच दिवस विनाबिघाड सेवा दिली होती. त्यामुळे प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला नेहमीच पसंती दिली आहे. मात्र बुधवारची संध्याकाळ या विश्वासाला अपवाद ठरली. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास मेट्रोच्या अंधेरी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आणि मेट्रो जागीच थांबली. गाडी बराच काळ थांबल्याचे बघून प्रवाशांनी मेट्रोचे दरवाजे आपत्कालीन काळात उघडण्यासाठीची प्रणाली वापरून दरवाजे उघडले. त्यानंतर अनेक प्रवाशांनी चालत पुढील स्थानक गाठले.
दरम्यान मेट्रोने घाटकोपर ते विमानतळ रस्ता या दरम्यान सेवा सुरू ठेवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याने विमानतळ रस्ता ते वर्सोवा यांदरम्यानच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी काही सेवा या टप्प्यात रद्द करण्यात आल्या. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी साधारण तासाभराचा कालावधी लागला. त्यानंतर संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास सेवा पूर्ववत झाल्या.
ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र हा बिघाड तातडीने दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेवरील वाहतूकही मंदावली
मुंबई : मध्य रेल्वेच्या विद्याविहार व कुर्ला या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर रुळाला तडा गेल्याने बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. या बिघाडामुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरू होती. अखेर हा बिघाड पाऊण तासाने दुरुस्त झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.
विद्याविहार व कुर्ला या स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वेरुळाला तडा गेल्याची घटना घडली. त्यानंतर अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा अप धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. या दरम्यान तीन फेऱ्या रद्दही केल्या. गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तसेच अप जलद व धिम्या मार्गावर अनेक गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्या होत्या. अखेर ७.१०च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करण्यात आला, मात्र दुपापर्यंत या बिघाडाचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवांवर जाणवत होता. अप जलद आणि धिम्या मार्गावरील अनेक गाडय़ा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.